पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांची माहिती;  लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर  : अल्पवयीन मुलींच्या बाबतीत गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. मुलींच्या जन्माचे दर कमी असलेल्या प्रदेशांमध्ये विवाहाकरिता मुली विकत घेतल्या जात आहेत. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे, त्यांना पळवून नेणे आणि त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. असे करणारे रॅकेटच सक्रिय झाले आहे, अशी माहिती परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी दिली.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा केल्या. फ्रेंण्ड्स कापड दुकानातील घटनेनंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात आले. शहरातील तीन महिला पोलीस उपायुक्तांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. त्यानंतर शहरातील प्रत्येक कापड दुकानातील कपडे बदलण्याची खोली तपासण्यात आली. भविष्यातही अचानकपणे या खोल्या तपासण्यात यायला हव्या. त्याशिवाय जिम, स्पा, मसाज सेंटर आदींमध्येही कपडे बदलण्याच्या खोल्या असतात. त्या ठिकाणीही अचानक पाहणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेला पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. विदर्भासह छत्तीसगड व मध्यप्रदेशातील तरुण-तरुणी शिक्षणासाठी नागपुरात येतात. परिमंडळ-२ मध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यांतर्गत हजारो तरुणी वसतिगृह व खासगी खोल्या करून राहतात. कुमार वयात प्रेमाचे आकर्षण असते. पण, काही वर्षांपासून प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलींना पळवणे व त्यांची विक्री करण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे तरुणींनी प्रेमात पडण्यापूर्वी काळजी घ्यावी व  घराबाहेर पळून जाण्याचे प्रकार टाळावेत, असेही शाहू यावेळी म्हणाल्या.

या भागात तरुणाईचे प्रमाण बघून त्यांना नशाखोरीची सवय लावण्यासाठी हुक्का पार्लर उघडण्यात येतात. पण, हर्बलच्या नावाखाली हुक्क्यामध्ये अंमली पदार्थ व दारू मिसळण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पार्लरविरुद्ध कारवाई करण्यात आली.  परिमंडळ-२ अंतर्गत तीन गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली. इतर गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए आणि इतर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. एकंदर गुन्ह्य़ांच्या घटनांमध्ये घट झाली आहे. पोलीस गस्त व नाकाबंदीमुळे सोनसाखळी चोरीच्या घटनाही कमी झाल्या आहेत, अशी माहिती शाहू यांनी दिली.

वाहनतळाच्या नावावर अवैध वसुली चालणार नाही

सीताबर्डी परिसरात वाहनतळाची समस्या आहे. पण, महापालिका व नासुप्रने कोणालाही कंत्राट दिले नसेल तर अवैध वसुलीचा गोरखधंदा चालू दिला जाणार नाही. सीताबर्डी उड्डाणपुलाखाली असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय सीताबर्डीतील वाहतूक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याशी चर्चा करण्यात येईल. फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेशी चर्चा सुरू आहे.

फुटाळ्यावर रात्री उशिरा वावर बंद

गणपती विसर्जनापासून ते नववर्षांच्या स्वागतापर्यंतचे सर्वात मोठे उत्सव परिमंडळ-२ अंतर्गतच मोठय़ा प्रमाणात होतात. या परिसरात बंदोबस्ताची जबाबदारी अधिक आहे. फुटाळ्यावर तरुणाईचा अधिक वावर असून रात्री उशिरापर्यंत तेथे बसण्याला आळा घालण्यात आला आहे. रात्री ९ वाजेनंतर फेरीवाल्यांना हटवण्यात येत आहे. रात्री १२ वाजेनंतर परिसरात कुणीही दिसल्यास पोलीस त्याची चौकशी करतात. त्यानंतर त्यांना घरी जाण्याचा सल्ला देतात किंवा मदत करतात. पोलीस ही लोकांच्या मदतीसाठी असून रात्रीच्या सुमारास कुणाला पोलिसांकडून विचारणा झाल्यास सहकार्य करावे.

फिरते पोलीस ठाण्याची संकल्पना

जिल्ह्य़ात अनेक गावे दूरवर असतात. प्रत्येक व्यक्ती पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे भंडारा पोलीस अधीक्षक असताना मी फिरते पोलीस ठाण्याची संकल्पना सुरू केली होती. एका मोबाईल व्हॅनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी दुर्गम भागातील गावांमध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधायचे. त्यांच्या तक्रारी ऐकून दखलपात्र गुन्हा होत असल्यास तो दाखल करून संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याची संकल्पना आम्ही राबवली. याला चांगले यश मिळाले होते, याकडेही शाहू यांनी लक्ष वेधले.