कारमधून अडीच कोटी लंपास केल्याची तक्रार; तीन पोलिसांवर संशय

नागपूर : नागपूर, प्रजापतीनगर चौकात कारमध्ये आढळलेल्या हवालाच्या तीन कोटी प्रकरणात सोमवारी ‘ट्विस्ट’ आला. खाकीनेच कारमधून अडीच कोटी रुपयांची रक्कम लुटल्याची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली. तीन पोलीस व टीप देणाऱ्या दोघांनी ही रक्कम लुटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हवालाची टीप देणारे रवि माचेलवार व सचिन पडगीलवार दोघेही बेपत्ता असल्याने रोख लुटण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. या तक्रारीमुळे नंदनवन पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

रविवारी पहाटे रवि व सचिनने दिलेल्या टीपवरून नंदनवन पोलिसांनी प्रजापती चौकात एमएच ३१ एफए ४६११ या क्रमांकाच्या कारला अडवले. पोलिसांनी कारमधील चालक राजेश वामनराव मेंढे (४०, रा. मिनीमातानगर, कळमना) व नवनीत गुलाबचंद जैन (२९, रा. शांतीनगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या वाहनात बसवले. हवालाची रोख असलेल्या कारमध्ये रवि, सचिन व तीन पोलीस कर्मचारी बसले. पाच ते आठ मिनिटांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी कारसह नंदनवन पोलीस ठाण्यात पोहोचायला हवे होते. मात्र, त्यांनी पोहोचायला ४५ मिनिटांचा अवधी लावला. यादरम्यान पाच जणांनी अडीच कोटी रुपयांची रोख लंपास केली, अशी लिखित तक्रार रायपूर येथील मॅपल ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे सोमवारी नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान, कारमधून जप्त  तीन कोटी १८ लाख रुपयांचा तपास आयकर विभागाने सुरू केला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पोलीस ठाण्यात सक्रिय असलेल्या मॅपल कंपनीच्या मध्यस्थाचा मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे.