विश्लेषणानंतर प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाय

चुलींची गुणवत्ता तपासणारी भारतातील पहिली यंत्रणा ‘नीरी’ या पर्यावरण संस्थेत उपलब्ध झाली आहे. आयआयटी मुंबईने क्लिन एनर्जी एक्सेस नेटवर्कसोबत मिळून सहज हाताळता येणारी ‘उत्सर्जन मापण यंत्रणा’ (इमिशन्स मेजरमेंट सिस्टम) तयार केली आहे. या यंत्रणेकरिता सीएसआयआर-नीरी, आयआयटी मुंबई आणि क्लीन या संस्थेत करार करण्यात आला.

स्वयंपाक तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुलींची गुणवत्ता चांगली नसेल तर चार भिंतीच्या आत देखील प्रदूषण होते. ग्रामीण भागात मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. मात्र, या विविध प्रकारच्या चुलींची गुणवत्ता ओळखणारे आणि कुठेही नेता येऊ शकणारे तंत्रज्ञान आजपर्यंत उपलब्ध नव्हते. यापूर्वी प्रयोगशाळांमध्ये चुली आणून त्याची तपासणी केली जात होती. नंतर त्या चुली कार्यक्षेत्रात जात होत्या. प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात होणाऱ्या तपासणीतून समोर येणारे परिणाम वेगवेगळे आहेत. या यंत्रणेमुळे प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन चुलींची तपासणी करता येणार आहे. चुलींच्या तपासणीनंतर उत्सर्जनाचा मानवी आरोग्यावर किती परिणाम होतो, याची माहिती मिळेल. या माहितीच्या विश्लेषणानंतर प्रदूषण कमी करण्यासंदर्भात उपाय योजता येतील. विशेष म्हणजे, ही यंत्रणा कोणत्याही वाहनातून बाहेर नेता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. याबाबत नीरी येथे भारतातील कार्यक्षेत्रातील चुलींची तपासणी, चुल संशोधन आणि तपासणी प्रयोगशाळा, चुल तपासणीकरिता बीआयएस  मानक अशा विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. यात नीरीचे वरिष्ठ संशोधक डॉ. नितीन लाभसेटवार, आयआयटी दिल्लीचे प्रा. सुधीर त्यागी, अभियंता अंकित गुप्ता आदी सहभागी झाले होते.

कार्यक्षेत्रात आणि प्रयोगशाळेत होणाऱ्या तपासणीतून येणारे उत्सर्जनाचे परिणाम वेगवेगळे आहेत. चार भिंतीच्या आतील वायु प्रदूषणात चूल, इंधन आणि खेळती हवा या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही तपासणी यंत्रणा उत्कृष्ट प्रतीची व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.

– प्रा. वीरेंद्र सेठी, आयआयटी, मुंबई

लोकांना आर्थिकदृष्टय़ा परवडणाऱ्या, सहज उपलब्ध असलेल्या आणि प्रदूषणमुक्त चुलींची गरज आहे. राष्ट्रीय ऊर्जा योजनेतही तसे नमूद आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. नीरीकडून आम्हाला तपासणी आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

– स्वाती भोगले, अध्यक्ष ‘क्लिन’