संपूर्ण तार बदलण्याऐवजी केवळ जोडणीवर भर

महेश बोकडे, नागपूर</strong>

उपराजधानीत नागपूर मेट्रोसह इतरही अनेक यंत्रणांची कामे सुरू आहेत. ती करताना गेल्या तीन वर्षांत महावितरण आणि एसएनडीएलच्या ३१९ भूमिगत व इतर वीज यंत्रणेतील तारा तोडण्यात आल्या. यात दोन्ही कंपन्यांचे सुमारे ११ कोटींचे नुकसान झाले. दुरुस्ती करताना या तारा पूर्ण बदलणे अपेक्षित असताना केवळ जोड देऊन कामे केली जात आहेत. त्यामुळे वीज तारेत जोड वाढून यंत्रणाच खिळखिळी होत आहे. या वीज कंपन्यांना भरपाई मिळत नसल्याने हा नवीन पर्याय शोधला जात असल्याची माहिती आहे.

नागपूरच्या महाल, सिव्हिल लाईन्स, गांधीबाग या भागातील साडेपाच लाख  ग्राहकांना एसएनडीएल तर काँग्रेसनगर विभागातील ग्राहकांना महावितरणकडून वीजपुरवठा होतो. दोन्ही कंपन्यांच्या काही भागातील वीज यंत्रणा भूमिगत असून काही भागात खांबावरून वीजपुरवठा केला जातो. प्रथमच नागपूरच्या वाटय़ाला देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या रूपाने केंद्रातील महत्त्वाचे मंत्रीपद मिळाले. ऊर्जामंत्रीपदही प्रथमच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जिल्ह्य़ाला मिळाले. महत्त्वाची मंत्रीपदे मिळाल्याने शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये होऊन येथे नागपूर मेट्रोसह विविध विकासकामांना गती मिळाली. परंतु ही कामे करताना एकाही यंत्रणेचे दुसऱ्यासोबत समन्वय नाही. त्यामुळे एप्रिल- २०१६ पासून आजपर्यंत शहरातील विविध भागात नागपूर मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ओसीडब्ल्यूसह इतरही कंपन्यांनी तब्बल  ३१९ वेळा वीज कामादरम्यान तार तोडल्या. तांत्रिकदृष्टय़ा वीज यंत्रणेतील भविष्यातील दोष टाळण्यासाठी या तार तुटल्यावर त्यात कमी जोड असावे म्हणून ती पूर्ण बदलणे गरजेचे असते. परंतु या तुटणाऱ्या तारेचे महावितरण आणि एसएनडीएल कंपन्यांना संबंधित कंपन्यांकडून भरपाई दिली जात नसल्याने केवळ तुटलेल्या तारांना जोड देऊन काम काढले जात आहे. या प्रकाराने येथे वीजहानीही जास्त असण्यासह पावसात तेथे पाणी शिरून अपघाताचाही धोका वाढत आहे. याबाबत महावितरण आणि एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी वीज तार तुटल्याचे मान्य करत अधिक बोलण्यास नकार दिला.

ऊर्जामंत्र्यांच्या सूचनांना केराची टोपली

ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरण, एसएनडीएलसह महापालिका आणि इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या बऱ्याच बैठकी घेतल्या. त्यात  वीज कंपन्यांना सूचित केल्याशिवाय काम न करण्याचे आदेश दिले, परंतु सगळ्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. या बैठकांमध्ये मंत्र्यांनी वीज कंपन्यांना वीज तारा तुटल्यास संबंधित कंपन्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरही पोलिसांकडून गुन्हा नोंदवला जात नसल्याचे वीज कंपन्यांतील अधिकारी सांगतात.

सर्वाधिक वीज तार तोडलेल्या कंपन्या

कंपनीची नावे                        संख्या

नागपूर मेट्रो                               ६६

राष्ट्रीय महामार्ग

प्राधिकरण                                 ६४

नागपूर महापालिका                   ५३

जीओ                                         १६

रूद्रानी इंफ्रा                                 ११

सार्वजनिक बांधकाम विभाग       १०

एल अ‍ॅन्ड टी                                 १०