महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना आरोग्याच्या इतर समस्या उद्भवत असल्याने त्यांना ‘पोस्ट कोविड केअर’ सुविधेची गरज आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांत अद्यापही या सुविधा उपलब्ध नाहीत. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयांत एक ते दीड महिन्यापासून ही सुविधा सुरू झाल्याने शासनाच्याच दोन विभागांबाबत दोन वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळत आहेत.

संक्रमण झाल्यावर हा विषाणू रुग्णाच्या फुप्फुस, हृदयासह इतरही काही अवयवांवर परिणाम करतो.

या रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत पोस्ट कोविड केअर सेंटरअंतर्गत स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभागाची सेवा सुरू केली आहे. नागपुरात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्येही ही सुविधा सुरू झाली आहे. येथे करोनामुक्त झालेल्यांच्या तपासण्या, व्यायाम,औषधोपचाराचाही सल्ला दिला जात आहे. परंतु राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या आरोग्य खात्याच्या रुग्णालयांत  ही सुविधा नाही. सर्व खासगी रुग्णालयांतही आता या सुविधा उपलब्ध होत आहेत. आरोग्य विभागाला मात्र जाग केव्हा येणार, असा  प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या विषयावर आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. नागपूर आणि अकोल्यातील आरोग्य उपसंचालक कार्यालयांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर अद्याप पोस्ट कोविड सेंटरबाबत सूचना नसल्याचे सांगितले.

करोनामुक्त झालेल्यांना काही समस्या आहेत काय, याची माहिती आरोग्य विभागाकडून पुण्यासह काही ठिकाणी गोळा करून डाटाबेस तयार केला जात आहे. त्यानंतर लवकरच पोस्ट कोविड केअर सेंटरबाबत कारवाई होईल. सध्या करोनामुक्त व्यक्तीला काहीही समस्या उद्भवल्यास त्यांच्यावर सर्व शासकीय रुग्णालयांत उपचार होत आहेत.

– डॉ. अर्चना पाटील, आरोग्य संचालक, आरोग्य सेवा