सत्ताधारी पक्षाकडून विविध सरकारी संस्थांवर कार्यकर्त्यांची, सगेसोयऱ्यांची नियुक्ती करणे ही काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकाळातील परंपरा भाजपने पुढे नेण्याचे ठरविले आहे. नुकत्याच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड)वर झालेल्या नियुक्तयांनी ही बाब स्पष्ट झाली आहे. सांस्कृतिक  किंवा चित्रपट क्षेत्राशी संबंधित असलेल्या या मंडळावर या क्षेत्रातील नियुक्तया अपेक्षित असताना या क्षेत्राशी दुरान्वये संबंध नसणाऱ्या पण नेत्यांच्या नातेवाईक असणाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसार मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्डावर) नागपूरमधून लेखिका आणि चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका माधुरी अशीरगडे, रंगभूमी आणि चित्रपट कलावंत संजय भाकरे आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत भाजपचे माजी आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक मानकर यांच्या पत्नी प्रगती मानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘सेन्सॉर बोर्ड’ चर्चेत आले असताना कला आणि चित्रपट क्षेत्रातील कलावंतांनी त्यावर मोठय़ा प्रमाणात टीका केली. सेन्सॉर मंडळावर कला क्षेत्राशी संबंधित व्यक्तीची निवड अपेक्षित आहे आणि गेल्या काही वर्षांत याच क्षेत्रातील कलावंतांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत.

संजय भाकरे आणि माधुरी अशीरगडे यांचा सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्राशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. दोघेही चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, रंगमंच या क्षेत्रात काम करीत असताना प्रगती मानकरचा मात्र या क्षेत्राशी कुठलाही दुरान्वये संबंध नसताना राजकीय कोटय़ातून केवळ माजी आमदाराच्या पत्नी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या अनेक महामंडळावर ज्यांचा काही संबंध नाही, अशा पक्षातील पदाधिकारी किंवा नातेवाईकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात मानकर यांचे नाव जोडले गेले आहे.

प्रगती मानकर यांचे अशोक प्रकाशन आणि अशोक एज्युकेशनल ट्रेडर्स ही प्रतिष्ठाने आहेत. शैक्षणिक पुस्तकाचे प्रकाशक व वितरक आहेत. कै. म.ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठान, आंतरराष्ट्रीय मानवधिकार संरक्षण ब्युरो, गायत्री महिला औद्योगिक संस्था, नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय, दी पीपल्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, उन्मन विकास संस्था, शास्त्री शिक्षण संस्था संचालित जवाहर हायस्कूल व प्राथमिक शाळा, जवाहर गुरुकुल आनंद शाळा, सहकार भारती, रोटरी क्लब, भारतीय स्त्री शक्ती, मूकबधिर विद्यालय, महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमी इत्यादी संस्थेचे पदाधिकारी आहे. मात्र यातील बहुतेक सर्व संस्था या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्याने सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्राशी त्याचा काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाची प्रदेश पातळीवर स्वतंत्र सांस्कृतिक आघाडी असून त्यात अनेक मान्यवर कलावंतांचा समावेश आहे. देशात आणि राज्यात या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन या आघाडीकडे असते. या आघाडीशी संबंधित असलेले आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नेत्यांच्या मागे राहून काम करणारे अनेक कलावंत कुठल्याही मंडळावर जाण्यास इच्छुक असताना अशोक मानकर यांच्या पत्नी प्रगती मानकर यांची सेन्सॉर बोर्डावर नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.