अॅड. प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणावे तरच काँग्रेसला पाठिंबा देण्यात येईल. आम्ही काँग्रेसकडे जागेबाबतचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आज शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, देशात महाआघाडी तयार केली जात आहे मात्र इंजिन अजून लागलेले नाही. त्यामुळे त्यात बसण्याचा सध्या विचार नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसकडे जागाबाबतचा कुठलाही प्रस्ताव देण्यात आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी अजूनही याबाबत कुठलीही चर्चा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक तिरंगा ध्वजाला मानत नाही. शिवाय संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत संघाला संविधानाच्या चौकटीत आणले जात नाही आणि तसे लेखी आश्वासन काँग्रेस देत नाही तोपर्यंत काँग्रेसला पाठिंबा देणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी एकदाच चर्चा झाली आणि त्यांच्यासमोर अजेंडा ठेवला आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. अन्यथा, आम्ही विदर्भातील ४८ जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. संघावर बंदी घालण्याची मागणी काही संघटनाकडून केली जात आहे. परंतु त्याने काही साध्य होणार नाही, उलट संघ वाढेल असेही अॅड.आंबेडकर म्हणाले.
तेलतुंबडेंची अटक हा कटाचा भाग
अॅड. आनंद तेलतुंबडे यांना कट रचून गोवण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात पाच हजार पानांचा जो अहवाल ठेवला आहे त्यात असलेल्या नावाची चौकशी करावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. या प्रकरणात चळवळीतील काही लोकांना विनाकारण गोवण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी पारदर्शकपणे चौकशी करावी अशी विनंती न्यायालयाला केली असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2019 12:13 am