तीन हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात

विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, ७ सप्टेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी पंतप्रधान दौऱ्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कडेकोट बंदबस्ताची आखणी केली आहे. पंतप्रधानांचा दौरा संपेपर्यंत उपराजधानीतील रस्त्यावर जवळपास तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार असल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

पंतप्रधान ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता सर्वप्रथम सुभाषनगर मेट्रो रेल्वेस्थानकावर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर मेट्रोतून सुभाषनगर ते सीताबर्डी मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करतील. सायंकाळी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सभा होईल.

क्रीडा संकुलाच्या आत ५ हजार व संकुलाबाहेर १५ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेते उपस्थित राहणार असून सर्वाच्या सुरक्षेची जबाबदारी नागपूर पोलिसांवर आहे. त्याकरिता पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात १३ पोलीस उपायुक्त, ३० सहाय्यक पोलीस आयुक्त, ८० पोलीस निरीक्षक, २०० सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक आणि २ हजार १०० कर्मचारी शहरात तैनात असतील.

त्याशिवाय बॉम्बशोधक व नाशक पथक, राज्य राखीव पोलीस बलाची एक तुकडी वेगवेगळ्या कार्यक्रम स्थळी तैनात राहणार आहे. पंतप्रधानांकरिता दोन वेगवेगळे कॅन्वॉय असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपायुक्त विनीता शाहू, वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि श्वेता खेडकर उपस्थित होते.

सीताबर्डीत ‘नो पार्किंग’; वाहतूकही वळवली

पंतप्रधानांच्या दौऱ्याचे मार्ग निश्चित करून वाहतूक पोलिसांनी सीताबर्डीतील आनंद सिनेमागृह ते मुंजे चौक-झांशी राणी चौक, मुंजे चौक ते व्हेरायटी चौक आणि मुंजे चौक ते मेट्रो रेल्वे पुलाखाली ७ सप्टेंबरला ‘नो पार्किंग’ झोन जाहीर केले आहे. तसेच मंगलमूर्ती चौक, हिंगणा टी-पॉईंट, सुभाषनगर, आनंद सिनेमागृह, यशवंत स्टेडियम, पंचशील चौक, महाराजबाग चौक, हिंदुस्तान बार कटिंग, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, नेताजी मार्केट, टेम्पल बाजार रोड, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, एलआयसी चौक, फरस गेट, मानकापूर चौक, पागलखाना चौक, पूनम चेंबर चौक, इटारसी पूल टी-पॉईंट, सीआयडी कार्यालय आणि बिजलीनगर या ठिकाणाहून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी ७ सप्टेंबरला हे मार्ग वगळून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पंडित यांनी केले.

वाहतूक व्यवस्थेसाठी ८०० वर कर्मचारी

पंतप्रधानांच्या दौऱ्यात वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी २ पोलीस उपायुक्त, ४ सहाय्यक आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक आणि ८०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधानांचा ताफा जसा जसा पुढे सरकेल तसतसे मार्ग खुले केले जातील, अशी माहिती चिन्मय पंडित यांनी दिली.

लॅपटॉप, पाणी बाटलीवर बंदी

कार्यक्रमस्थळी  कुणालाही लॅपटॉप, आयपॅड, ज्वलनशील पदार्थ, शस्त्र, जेवणाचे डबे, पाण्याची बाटली नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या वस्तू लोकांनी स्वत:जवळ बाळगू नयेत. मानकापूर क्रीडा संकुल परिसरात पासनिहाय प्रवेशद्वार निश्चित करण्यात आले आहेत.