जास्त नमुने पाठवण्यासाठी विविध वस्तूंचे प्रलोभन

महेश बोकडे, नागपूर</strong>

(भाग-१)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे जास्तीत जास्त नमुने तपासणीसाठी मिळवून मोठी कमाई करण्यासाठी मेडिकल चौकातील काही खासगी प्रयोगशाळांकडून येथे सेवा देणाऱ्या काही डॉक्टरांना रात्री पाटर्य़ा देण्यासह विविध वस्तूंचे प्रलोभनही दाखवले जात आहे. या आमिशाला बळी पडून काही डॉक्टर व कर्मचारी रुग्णांचे नमुने खासगी प्रयोगशाळेत पाठवण्यास मदत करतात. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना फटका बसत आहे.

मेडिकल आणि त्याच्याशी संलग्नित सुपरस्पेशालिटी, ट्रामा केयर सेंटर येथे एकूण २,२०० च्या जवळपास खाटा मंजूर आहेत. त्यावर रोज विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या भागातील गरीब व मध्यमवर्गीय गटातील सुमारे १,७०० ते १,८०० अत्यवस्थ रुग्ण दाखल होऊन उपचार घेत   असतात, तर मेडिकल आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत रोज सुमारे चार हजार जण बाह्य़रुग्ण विभागातील वैद्यकीय सेवेचा लाभ घेतात. पैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर रक्त, मल-मूत्रासह इतरही विविध प्रकारच्या तपासण्या काढण्याचा सल्ला देतात. तपासणीच्या अहवालावरच रुग्णांवरील उपचाराची पुढील दिशा निश्चित केली जाते.

मेडिकलमध्ये शासनाने सुरू केलेल्या प्रयोगशाळेत जवळपास सर्वच तपासण्यांची सोय आहे. परंतु येथे अनेकदा तपासणीसाठी आवश्यक रसायनासह किट्स संपत असल्याने रुग्णांना तपासणीसाठी बाहेर पाठवले होते, परंतु त्यानंतरही येथे जवळपास ९० टक्के तपासण्या नेहमीच होतात. दरम्यान, मेडिकल चौकातील काही खासगी प्रयोगशाळेच्या मालकांनी जास्तीत जास्त रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मिळवून जास्त कमाई करता यावी म्हणून नवीन क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यानुसार मेडिकलच्या काही डॉक्टरांना जास्त नमुने पाठवल्यास पाकीट, मोबाईल, शर्ट, बेल्ट, परफ्युमसह इतरही वस्तूंचे प्रलोभन दाखवले जाते. तर रात्रीला विविध मोठय़ा हॉटेल्समध्ये या डॉक्टरांसाठी पाटर्य़ाही आयोजित केल्या जातात. हा प्रकार मेडिकलमधील अनेक अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षकांनीही बघितला असतानाही त्यावर कुणीही खुलेपणाने बोलायला तयार नाही. या प्रयोगशाळेत नमुने पाठवणे थांबवण्यासाठी प्रशासनाकडून नि:पक्ष चौकशी व कारवाई केली जाणार काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.

‘‘कोणत्याही डॉक्टरांचे खासगी प्रयोगशाळेसोबत काही संबंध असल्याच्या प्रशासनाकडे तक्रारी नाहीत. परंतु प्रकरणाचे गांभीर्य पाहता ही बाब तपासली जाईल. त्यात काही अनुचित प्रकार आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाईल.’’

– डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर.

मेडिकलमधील रुग्णांची स्थिती

वर्ष           बाह्य़रुग्ण       आंतरुग्ण

२०१६         ७,१९,०११     ६४,८४३

२०१७         ८,१५,१३५     ७२,२२५

२०१८         ९,६३,७३४     ८५,५६९