ज्येष्ठ वन्यजीव तज्ज्ञ व पर्यावरण संघटनांचा खुलासा

अमरावती जिल्ह्यतील छत्री तलाव परिसरातील प्रस्तावित उद्यानाचा त्रास वन्यजीवांना नव्हे तर अवैध चराई करणाऱ्यांना तसेच या क्षेत्रात दारूभट्टय़ा लावणाऱ्यांना होणार असल्यामुळे या उद्यानाच्या प्रस्तावास काही नव्या सर्पमित्रांना समोर करून, दुग्धव्यवसाय करणाऱ्या व अवैध दारूनिर्मिती करणाऱ्या काही महाभागांनी विरोध चालवला असल्याचा खुलासा शहरातील ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ व पर्यावरण संघटनांनी केला आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गेल्या २५ वर्षांपासून वने व वन्यजीव संरक्षण या क्षेत्रात काम करीत असलेल्या निसर्ग संरक्षण संस्था अमरावती, सातपुडा फाऊंडेशन, वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संस्था (वेक्स), विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षणाचे काम करणारी दिशा फाऊंडेशन, युथ फॉर नेचर कन्झर्वेशन व वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था यांनी आज या उद्यानाच्या प्रस्तावाबाबत खुलासा केला. राज्य शासनाने दिवं. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान योजनेअंतर्गत राज्यातील मोजक्याच शहरांमध्ये जैवविविधता उद्यान उभारण्याचे ठरवले आहे. अमरावती शहरातील लोकप्रतिनिधींनी वनसंरक्षणाचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मोठय़ा प्रयत्नाने अमरावती शहरात आणला. यासाठी छत्री तलावामागील रस्त्यालगतची ३० एकर जागा सामाजिक वनीकरण विभागाला फक्त उद्यान निर्मितीसाठी देण्यात आली आहे. त्या जागेचा दर्जा वनजमीन असून तो कायम राहणार आहे. उद्यान निर्मितीनंतर ती जागा पुनश्च वनविभागाकडेच राहील. या प्रस्तावास छत्री तलाव परिसरातील बाराही महिने चराई करणाऱ्या काही दुग्ध व्यावसायिकांनी व नजीकच्या जंगलात अवैध दारूभट्टय़ा चालवणाऱ्यांनी या भागातील काही सर्पमित्रांना समोर करून विरोध चालवला आहे. शहरासाठी अत्यंत मानाचा असा हा प्रकल्प आहे. याठिकाणी मेळघाट व अमरावती जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वनौषधी, बांबूच्या प्रजाती आणून नक्षत्रवन, चंपक वन, अशोक वन आदी वैविध्यपूर्ण वनप्रकारांची निर्मिती होणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाला ही जागा कोणत्याही प्रकारचे पक्के बांधकाम करण्यात येऊ नये, या अटीवरच वनखात्याने तात्पुरती दिली आहे. तरीही ही मंडळी याठिकाणी भव्य योग भवन वगैरे बांधणार आहेत, असा अपप्रचार सुरू आहे. या भागातील काही सर्पमित्रांनी कुंपणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, या कुंपणाच्या अगदी डाव्या बाजूने गेले अनेक वर्षे तारेचे कुंपण व लोखंडी फाटक होते. हा ३० एकर परिसर सोडला तर साधारणपणे ४५० एकर सपाट वनक्षेत्र वन्यप्राण्यांसाठी अद्यापही मोकळे आहे. त्यामुळे या सर्पमित्रांनी उपस्थित केलेल्या कुंपणाचा मुद्दाही हास्यास्पद आहे. अर्निबध चराईमुळे जमिनीची धूप होऊन याठिकाणी रायमुनिया, बाभळी, हिवर, सुबाभूळ अशा प्रजाती पसरल्या आहेत. यातील काही प्रजातींचे उच्चाटन करावेच लागते. इतर प्रजातींच्या प्रस्तावित ठिकाणाची निवडक बाभळीची झाडेच फक्त काढण्यात आली असून बाकी झाडे तशीच ठेवण्यात येणार आहेत. तरीही वृक्षतोडीचा मुद्दा या मंडळींनी उभा केला आहे. या भागातील शहरांमधील अनेक नागरिक सकाळी पायी फिरण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी झाडाखाली बसण्यासाठी, ध्यान करण्यासाठी नैसर्गिक व्यवस्था असणार आहे. मात्र, याचा अर्थ योग भवन बांधणार असा या मंडळींनी काढला आहे. येथे देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्थाही तात्पुरत्या स्वरूपाचीच असणार आहे. गाडय़ा घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी रस्त्यालगतच वाहनतळ असणार आहे. भविष्यात अभयारण्य झाल्यास पर्यटनासाठी खुल्या जिप्सी गाडय़ाही येथून काढता येणार आहे. यातून भविष्यात काही युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. आज या परिसरात अवैध दारू व्यवसायातील लोक सक्रिय असल्याने महिला व मुली एकटय़ाने पायी फिरू शकत नाही. या अनोख्या जैवविविधता उद्यानामुळे शहरातील महिला, विद्यार्थी व मुली येथील निसर्गाचा आस्वाद घेऊ शकणार आहे.

अमरावती शहरासाठी अभिमानाच्या अशा या पर्यावरणीय प्रकल्पाबाबत सर्पमित्रांनी जनतेत विनाकारण संभ्रम पसरवण्यापेक्षा या कामात शासनास व लोकप्रतिनिधींना सहकार्य करावे, असेही या पत्रकात प्राणीशास्त्रज्ञ डॉ. गणेश वानखेडे, वेक्सचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, युथ फॉर नेचर कन्झर्वेशनचे डॉ. स्वप्निल सोनोने, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष यादव तरटे, कार्सचे सावन देशमुख, वन्यजीव संरक्षण व निसर्ग संरक्षण संस्थेचे अंगद देशमुख यांनी म्हटले आहे.