शहरातील मान्यवरांची संतप्त प्रतिक्रिया; परवानगीविनाच कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची कुठलीही रितसर परवानगी न घेता लोकप्रशासन विभागाने हिंदुत्ववादी विचाराला पोषक अशा ‘बदलत्या काळात हिंदुत्व’ या विषयावर कार्यक्रम घेतला.  लोकप्रशासन विभागाची ही कृती म्हणजे विद्यापीठाचे दुर्भाग्य होय, अशा शब्दात शहरातील मान्यवरांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाने अभ्यासक्रमाशी कुठलाही संबंध नसताना ४ मे रोजी ‘बदलत्या काळात हिंदुत्व’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले होते. ‘लोकसत्ता’ने हे वृत्त प्रकाशित करताच विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली.

विविध समाजमाध्यमांवरही याचे पडसाद उमटले.

दोन वर्षांआधी विद्यापीठामध्ये राज्यसभा सदस्य सीताराम येच्युरी यांच्या  व्याख्यानाला संघ परिवारातील संस्थांनी विरोध केला होता. विद्यापीठामध्ये यावरून वाद निर्माण झाल्यानंतर कुठलाही कार्यक्रम घेताना त्याची  रितसर परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशाकडे दुर्लक्ष करून लोकप्रशासन विभागाने  परवानगीविनाच कार्यक्रम घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

प्रतिक्रिया

अशाप्रकारचे कार्यकम विद्यापीठात होणे हे दुर्भाग्य आहे. विद्यापीठ हे एका विचारधारेवर चालणारी संस्था नाही. दुसऱ्या विचारधारेच्या कार्यक्रमांना विरोध करणे आणि हिंदुत्वाला पोषक विचारधारेचे कार्यक्रम घेणे योग्य नाही. ज्यांनी असे कार्यक्रम घेतले त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.

– डॉ. बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ.

विद्यापीठात कशा कशावर काय काय करायचे व काय करायचे नाही, याबाबत काही संहिता आहे काय हे मला ठाऊक नाही. काही नियमबा घडत असेल तर संबंधितांनी दखल घ्यावी. मात्र सर्वच विचारधारांचे सम्यक विश्लेषण, अध्ययन, चिकित्सा  विद्यापीठात व्हायलाच हवी. त्यासाठीच तर विद्यापीठात वेगवेगळ्या विचारधारांचे अध्ययन, संशोधन करणारे विभाग असतात. सर्वच धर्म आणि दर्शनांच्या अंगाने विद्वत्तापूर्ण धर्मचिकित्सा देखील विद्यापीठात व्हायला हवी.  फक्त एखाद्याच विशिष्ट बाजूचा प्रचार, प्रसार तेवढा नसावा.

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ साहित्यिक.

असा कार्यक्रम घेण्यात मला कुठलीही अडचण वाटत नाही. विद्यार्थ्यांसमोर सर्व विचार यायला हवेत. विशेषत: हिंदुत्वाबद्दल अलीकडे अतिरेकी प्रचार आणि दुसरीकडे संयमित बोलणे सुरू आहे. अशा परिस्थितीत हिंदुत्वाची व्याख्या नेमकी कोणती?, जी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित होती ती की संघांनी पाळली ती, की महात्मा गांधी, लोकमान्य टिळकांना अपेक्षित होती ती, याचा अभ्यास करून वस्तुनिष्ठ आकलन विद्यार्थ्यांसमोर ठेवणे आवश्यक आहे.

– डॉ. वि.स. जोग, ज्येष्ठ साहित्यिक.

सर्वधर्मसमभाव शिकविणाऱ्या राष्ट्रसंतांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात गत काही वर्षांपासून हा दुर्भाग्यपूर्ण प्रकार सुरू आहे. संघ आणि भाजपचा छुपा अजेंडा विद्यापीठात राबविला जात आहे. मागे अभ्यासक्र मात संघ विचारांचा समावेश करण्याचाही असाच प्रकार घडला होता. मात्र, हा देश संविधानानुसार चालणारा आहे.   विद्यापीठात घडलेल्या या प्रकाराबद्दल आपण उच्च तंत्र विभागात तक्रोर करणार असून कठोर कारवाईची मागणी करणार आहोत.

 अतुल लोंढे,  प्रवक्ते, काँग्रेस.