नितेश राणे, कोळंबकर यांच्यावर कारवाईचे संकेत

नुकत्याच झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीत नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर या आमदारांनी  विरोधी पक्षाच्या उमेदवारास मतदान केल्याचे जाहीर मान्य केले आहे. त्यामुळे माझे विरोधीपक्षनेतेपद गेले तरी बेहत्तर पण, या दोघांवर कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी बोलतांना पाटील यांनी ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत नितेश राणे व कालिदास कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोघांनीही प्रसिध्दी माध्यमांना तशी माहिती दिली होती. नितेश राणे यांनी तर कॉग्रेसने कारवाई करून दाखवावी, असे आव्हान दिले होते. याबाबत विचारले असता, या प्रकरणी पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी आमदार शरद रणपिसे यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या दोघांनी मतदानानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिRीयांच्या क्लीपही गोळा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोघांवर पक्षांतर्गतबंदी कायद्यानुसार पक्ष निश्चितपणे कारवाई करेल. विधानभेत सध्या कॉग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत. या दोघांवर कारवाई केली तर कॉग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा कमी होईल आणि विरोधीपक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळेल.मात्र पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाची पर्वा नसून पक्षाविरोधात कारवाई करणाऱ्यांवर निश्तित कारवाई होईल असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.