दिवसभर उन्हाचा तडाखा असतानाच सायंकाळी गारपीट, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरात चांगलेच थमान घातले. यावेळी सर्वसामान्य नागरिकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर जमलेल्या अनुयायांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात आभाळी वातावरण आहे. सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी येत आहेत. मात्र, शनिवारी दिवसभर ऊन तापले आणि सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली. पाच वाजताच्या सुमारास हलक्या कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी थोडय़ावेळातच उग्र रूप धारण केले. वादळी वाऱ्यासह संपूर्ण शहरातच जोरदार पाऊस कोसळला, तर शहरातील छत्रपतीनगर, प्रतापनगर, तात्या टोपेनगर, मानेवाडा आदी परिसरात अचानक गारपीट सुरू झाली. बोराच्या आकाराच्या गारा शहरात पडल्या. अचानक सुरू झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाने रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. दीक्षाभूमीवर जमलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला. सायंकाळची वेळ असल्याने गर्दी होती. पावसापासून वाचण्यासाठी त्यांना कुठेही आडोसा मिळाला नाही. त्यामुळे गोंधळ उडाला. याशिवाय दीक्षाभूमीच्या समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाशी संबंधित पुस्तके, मूर्ती आणि इतर किरकोळ वस्तूंची दुकाने विक्रेत्यांनी थाटली होती. उन्हापासून बचावासाठी त्यांनी शेड टाकले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 5:19 am