२४ तासांत ७६ मृत्यू; ४,९८७  नवीन रुग्ण

नागपूर :  जिल्ह्यात अनेक आठवड्यानंतर नवीन करोनाग्रस्तांची संख्या पाच हजारांखाली तर मृत्यूसंख्याही ८० रुग्णांहून खाली नोंदवण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. येथे २४ तासांत ७६  रुग्णांचा मृत्यू तर ४ हजार ९८७ नवीन रुग्णांची भर पडली.

जिल्ह्यात मार्चच्या शेवटपासून एप्रिल महिन्यात करोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. त्यामुळे सातत्याने चिंतेत भर पडत असतानाच अनेक आठवड्यानंतर सोमवारी दिवसभरात करोनाग्रस्तांची संख्या कमी आढळली.  शहरात २४ तासांत ४८, ग्रामीण १६, जिल्ह्याबाहेरील १२ अशा एकूण ७६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार ६४५, ग्रामीण १ हजार ९३७, जिल्ह्याबाहेरील १ हजार ९३ अशी एकूण जिल्ह्यात ७ हजार ६७५ रुग्ण नोंदवली गेली.  दिवसभरात शहरात ३ हजार १६१, ग्रामीण १ हजार ८१४, जिल्ह्याबाहेरील १२ असे एकूण जिल्ह्यात ४ हजार ९८७ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४ हजार २७२, ग्रामीण १ लाख १८ हजार ८१०, जिल्ह्याबाहेरील १२ अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख २४ हजार ३५७ रुग्ण अशी नोंदवण्यात आली.  शहरात दिवसभरात १६ हजार ७२६, ग्रामीण ३ हजार ४५२ अशा जिल्ह्यात  एकूण  २० हजार १७८ संशयितांनी चाचणीसाठी नमुने दिले. त्याचे अहवाल मंगळवारी अपेक्षित आहेत. परंतु रविवारी चाचणी झालेल्या १८ हजार ६२९ नमुन्यांमध्ये ४ हजार ९८७ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण २६.७७ टक्के नोंदवले गेले.

लसीचा तुटवडा कायम

शहरात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर सोमवारी सर्व ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले. शहरात लसीकरणाचा तुटवडा बघता उद्या मंगळवारी शहरातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे प्र्रभाकरराव दटके, महाल रोगनिदान केंद्र वगळता इतर केंद्रावर लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त  राम जोशी यांनी दिली.  पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जाईल. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण महापालिकेद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहील, असे जोशी यांनी सांगितले आहे.

नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक

शहरात दिवसभरात ४ हजार ५९६, ग्रामीणला २ हजार ५ असे एकूण जिल्ह्यात ६ हजार १ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख ५८ हजार ५८३, ग्रामीण ८५ हजार ६६२ अशी एकूण ३ लाख ४४ हजार २४५ व्यक्तींवर पोहचली आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी दैनिक नवीन रुग्णसंख्येहून करोनामुक्त अधिक असल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे.

विदर्भातही करोनाग्रस्तांच्या रुग्ण व मृत्यूसंख्येत घट!

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून सतत २७० हून अधिक करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असतानाच सोमवारी २४ तासात २२८ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. तर दिवसभरात रुग्णसंख्याही घटून ११ हजार १४७ वर आल्याने आंशिक दिलासा मिळाला आहे.नागपूर शहरात दिवसभरात ४८, ग्रामीण १६, जिल्ह्याबाहेरील १२, अशा एकूण ७६ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्यातील ३३.३३ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. तर  नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ४ हजार ९४८ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १० रुग्णांचा मृत्यू तर ५५० रुग्ण, अमरावतीत १९ मृत्यू तर ९०३ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २२ मृत्यू तर ९७३ रुग्ण, गडचिरोलीत ११ मृत्यू तर २३९ रुग्ण, गोंदियात ९ मृत्यू तर २४० रुग्ण, यवतमाळला २८ मृत्यू तर १ हजार ३९९ रुग्ण, वाशीमला २ मृत्यू तर ४२४ रुग्ण, अकोल्यात १८ मृत्यू तर ३८७ रुग्ण, बुलढाण्यात ८ मृत्यू तर ७२८ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात २५ मृत्यू तर ३१७ नवीन रुग्ण आढळले. दरम्यान, विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने साडेबारा हजारांहून अधिक नवीन करोनाग्रस्तांची नोंद केली जात असतानाच सोमवारी अनेक दिवसांनी ही संख्या १२ हजारांहून खाली नोंदवली गेली.

मध्यवर्ती कारागृहात १८ कैद्यांना करोना

मध्यवर्ती कारागृहातील १८ कैद्यांना करोना झाल्याचे आढळून आले. यात पहिल्यांदाच महिला कैद्यांनाही करोना झाल्याचे निदान झाले. त्यांची संख्या १४ आहे. करोनाबाधितांची संख्या वाढल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने ८९ बंदिवानांची तपासणी केली. रविवारी त्यांचा अहवाल आला. यात १४ महिला व चार पुरुष बाधित असल्याचे समोर आले. करोनामुळे आतापर्यंत तीन बंदिवानांचा मृत्यू झाला आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या ७२,४३७ वर

शहरात ४१ हजार ३४१, ग्रामीणला ३१ हजार ९६ असे एकूण ७२ हजार ४३७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ६३ हजार ७७१ रुग्णांवर गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील ८ हजार ६६६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयांत दाखल रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात दिसत आहे.

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहेत, याची माहिती  http://www.nmcnagpur.gov.in व  http://nsscdcl.org /covidbeds वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आयसीयू प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा २३७ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा ४१ उपलब्ध होत्या.