विदर्भात १० ते ४० टक्के कंत्राटी कामगार रोजगाराविना; उत्पादनातही ३० टक्के घट

चंद्रशेखर बोबडे/ महेश बोकडे, नागपूर</strong>

उद्योग क्षेत्रातील मंदीची झळ विदर्भातील वाहननिर्मिती क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही तर इतर उद्योगांसमोरही आर्थिक संकट आवासून उभे राहिले आहे. मागणी कमी झाल्याने उद्योगांनी उत्पादनात घट केली. परिणामी, अतिरिक्त ठरलेल्या अस्थायी तथा कंत्राटी कामगारांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. उत्पादनातील घट २० ते ३० टक्के तर कामगार कपातीचे प्रमाण तब्बल १० ते ४० टक्के असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत विदर्भात मुळातच औद्योगिकीकरणाचे प्रमाण कमी आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्य़ात अशोक लेलॅण्डचा प्रकल्प, नागपूरमध्ये हिंगणा एमआयडीसीमध्ये महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचा ट्रॅक्टर प्रकल्प. याशिवाय बुटीबोरी आणि हिंगणा औद्योगिक वसाहतीत छोटे व मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. लेलॅण्डमध्ये ट्रकचे गिअर बॉक्स लावण्याचे काम होते. या कंपनीत २५ टक्के काम कमी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या कारखान्यातही काही दिवसांपूर्वी काही दिवस काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराचे कारण देण्यात आले. उत्पादनावर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा कंपनीचे अधिकारी करीत आहेत.

मंदीची झळ वाहन खरेदी-विक्री क्षेत्राला अधिक बसली आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल ते २८ ऑगस्ट २०१८ या सहा महिन्यांत आरटीओकडे १०.२५ लाख सर्व प्रकारच्या नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. यंदा याच काळात ही संख्या ८.५६ लाख इतकी कमी झाली आहे. ही घट १.६९ लाख वाहनांची आहे. नागपूर शहर आरटीओकडे एप्रिल ते जुलै २०१७ दरम्यान ८,६९१ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. यंदा २०१९ मध्ये याच काळात ७ हजार ८२० झाली आहे. यावरून या क्षेत्रातील मंदीची तीव्रता लक्षात येते.

शहरात सरासरी दुचाकी आणि चारचाकीचे एकूण ८४ वितरक आहेत. कारच्या विक्रीत जुलै महिन्याच्या अखेपर्यंत २३ टक्के घट झाल्याचे वितरकांनी सांगितले. हिंगणा मार्गावरील सुमित मोटर्स या तीनचाकी वाहन विक्री वितरकांकडे १९ कर्मचारी होते. मंदीमुळे विक्री घटल्याने त्यांनी ९ कर्मचारी कमी केले. त्यात तीन विक्री प्रतिनिधी, ३ मेकॅनिक व तीन इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याच भागातील बजाज दुचाकीच्या विक्रेत्यानेही त्यांच्याकडील तीन कर्मचारी कमी केले. शहरातील इतरही भागात सारखेच चित्र आहे. बुटीबोरीतील पॉलिस्टर धागा तयार करणाऱ्या कारखान्यातून १५ कंत्राटी कामगारांची कपात करण्यात आली. खासगी इस्पितळांना स्वच्छता कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एका कंपनीकडे चार महिन्यांपूर्वी ५५० कर्मचारी होते, आता ही संख्या ३५० वर आली आहे.

बुटीबोरी, हिंगणा आणि जिल्ह्य़ातील इतरही एमआयडीसीमधील उद्योगांची स्थिती बरी नाही. काहींनी त्यांचे उद्योग बंद केले आहेत, तर काहींनी उत्पादनात घट केली आहे. मालाची ने-आण करणारे छोटे ट्रक एमआयडीसी परिसरात उभे आहेत. त्यावर काम करणाऱ्या मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरव्ही दिवसभर त्यांना काम मिळत होते. मंदी व जीएसटीमुळे ही स्थिती उद्भवल्याचे प्रसिद्ध उद्योजक ए.के. गांधी यांनी सांगितले.

परिस्थिती काय?

सर्वाधिक कामगार कपात ही वाहन खरेदी-विक्री व्यवसायात आहे. बडय़ा उद्योगांतील प्रशिक्षणार्थी कामगारांचा कालावधी ३ वर्षांहून ६ महिन्यांपर्यंत घटवण्यात आला आहे. इतर मध्यम आणि छोटय़ा उद्योगांतही कमी अधिक प्रमाणात असेच चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास अनेक उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती आहे.

मिळेल त्या रोजगाराकडे कल..

सोमेश्वर कुमरे हा बुटीबोरीतील धागा निर्मिती कंपनीत कंत्राटी कामगार होता. कंपनीने कामावरून कमी केल्याने तो बेरोजगार झाला. कुटुंबाची जबाबदारी असल्याने सतत दोन महिने बुटीबोरी एमआयडीसीत त्याने मिळेल ते काम केले. सध्या तो रेल्वे स्थानकावर स्वच्छता कर्मचारी पुरवठा करणाऱ्या एका कंपनीत काम करतो व रेल्वे स्थानकावर स्वच्छता करतो.

पूरक उद्योगांवर परिणाम

* वाहन खरेदी-विक्रीचा परिणाम फक्त या उद्योगांपर्यंतच मर्यादित नाही तर वितरक, उपवितरक, वाहन सव्‍‌र्हिसिंग सेंटर, सुटे भाग विक्री करणारे, गाडय़ांची वाहतूक करणारे कन्टेनर, स्वच्छता कर्मचारी पुरवठादार कंपन्या यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

* हिंगणा येथील बजाज दुचाकीच्या उपवितरकाने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर कामगार कपातीची बाब मान्य केली.

* जून-जुलैमध्ये शाळा, महाविद्यालयाचे निकाल लागल्यावर दुचाकीच्या विक्रीत वाढ होते. यंदा त्यात कमालीची घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

दर महिन्याला आम्ही २५ ते ३० गाडय़ांची विक्री करीत होतो. आता ती सात ते आठ गाडय़ांवर आली आहे. व्यवसायाचा महिन्याला लागत खर्च अडीच ते तीन लाखांच्या घरात आहे आणि उत्पादन सव्वा लाखांवर आले आहे. त्यामुळे कामगार कपातीशिवाय पर्याय नव्हता, आम्ही ९ कामगारांना कमी केले.

– सुमित भालेकर, संचालक सुमित मोटर्स, नागपूर

उत्पादनाला बाजारात मागणी नसल्याने उद्योजकांनी उत्पादनात घट केली. बोटावर मोजण्याइतक्या उद्योगांचा अपवाद सोडला तर  इतर कुठलाही उद्योग पूर्ण क्षमतेने चालवणे सध्याच्या काळात शक्य नाही, त्याचा परिणाम कामगारांवर झाला असून सध्या वेगवेगळ्या उद्योगांत कामगार कपातीचे प्रमाण १० ते ४० टक्के दरम्यान आहे, अशीच स्थिती पुढील काही महिने कायम राहिल्यास काही उद्योगांना उत्पादन थांबवावे लागेल.

– अतुल पांडे, अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.