मोक्याची जागा, दर्जेदार सुविधा देऊनही प्रतिसादाची प्रतीक्षाच

नागपूर : व्यवसायासाठी आवश्यक असलेली अतिशय मोक्याची ठिकाणे असूनही बाजरपेठेत असलेली मंदी आणि दीड वर्षांपासून सुरू असलेली करोनाची साथ यामुळे महामेट्रोच्या शहरातील प्रमुख स्थानकांच्या वाणिज्यिक वापराला अपेक्षित प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या एकूण २१ पैकी पाच स्थाकांवरीलच दुकाने भाडेतत्त्वार देण्यात आली आहेत.

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प सर्वार्थाने जागतिक दर्जाचा असल्याने आणि गतीने पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात ओळख निर्माण करणारा ठरला आहे. महामेट्रोची वर्धा आणि हिंगणा मार्गावरील सर्व प्रमुख स्थानके ही व्यावसायिकदृष्टय़ा अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत. वाहनतळाच्या व्यवस्थेपासून सर्व सुविधा तेथे उपलब्ध आहेत. ही बाब लक्षात घेऊनच महामेट्रोने स्थानकात उपलब्ध जागेचा वाणिज्यिक वापर करण्याचे ठरवले होते. त्यानुसार सर्व स्थानके ९ वर्षांसाठी भाडेतत्त्वार देण्याची योजना आखण्यात आली. शहरात सुरू असलेली एकूण २१ स्थानके आहेत. त्यापैकी चार स्थानकांवरील (झाशी राणी चौक, लोकमान्य नगर, सुभाषनगर, इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स) सर्व दुकाने भाडेतत्त्वावर गेली. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट स्थानकावर मदर डेअरीने जागा घेतली. उर्वरित स्थानकांवरील  जागांच्या वाणिज्यिक वापरासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

यासंदर्भात महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांना विचारले असता ते म्हणाले, सुरुवातीला दुकाने भाडेतत्त्वावर देण्याच्या योजनेला व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. मधल्या काळात  टाळेबंदीचा फटका बसला. परंतु, आता स्थिती पूर्वपदावर येत असल्याने मेट्रोच्या योजनेला प्रतिसाद मिळेल. झिरोमाईल्स स्थानकावरील दुकानांसाठी निविदा काढण्यात आली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बाजारपेठेत असलेले मंदीचे वातावरण आणि दीड वर्षांपासून करोना महामारीमुळे सर्वसामान्यांमध्ये असलेले भय याचा एकूणच परिणाम व्यवसायावर झालेला आहे. पुढचा काळही अनिश्चिततेचा असल्याने नव्याने गुंतवणूक करण्यास व्यापारी घाबरत आहेत. याचाही फटका महामेट्रोच्या वाणिज्यिक योजनेला बसला असावा.

-नितीन रोंघे, युवा उद्योजक, नागपूर.

मेट्रो प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘नॉन फेअर बॉक्स रेव्हेन्यू’ या अंतर्गत मेट्रोची स्थानके ९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली जातात. आजवर लोकमान्य नगर, सुभाषनगर, झाशी राणी चौक, इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्स या स्थानकावरील सर्व दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत.  इतरही स्थानकांवर अशाच प्रकारे जागा व्यावसायिकांनी घेतली आहे. आता स्थिती पूर्ववत होत असल्याने पुढच्या काळात याला गती येईल, अशी अपेक्षा आहे.

– महामेट्रो. 

गेल्या दीड वर्षांत कुठलेही नवीन दुकान सुरू झाल्याचे स्मरत नाही. करोनामुळे व्यापार चौपट झाल्याने व्यावसायिक नवे धाडस करण्यास धजत नाहीत.

– ओम जाजोदिया, व्यावसायिक.