२४ तासांत ८ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात पंधरा दिवस एकही करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, गुरुवारी सोळाव्या दिवशी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय २४ तासांत ८ नवीन रुग्ण आढळले.

जिल्ह्य़ात ३१ ऑगस्टला १ रुग्णाचा मृत्यू झाला होता. हा रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरून नागपुरात उपचाराला आला होता. त्यानंतर पंधरा दिवस एकही मृत्यू नोंदवला गेला नाही. परंतु गुरुवारी सोळाव्या दिवशी एका रुग्णाचा मृत्यू झाला. हाही रुग्ण जिल्ह्य़ाबाहेरून येथे उपचाराला आला होता. या मृत्यूमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्ताच्या मृत्यूची संख्या ५,८९३, ग्रामीण २,६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२४ अशी एकूण १०,१२० रुग्णांवर पोहोचली आहे. शहरात १३ सप्टेंबरला १४ रुग्ण, १४ सप्टेंबरला १२ रुग्ण, १५ सप्टेंबरला १० रुग्ण अशी दोन आकडी संख्या आढळली होती. गुरुवारी शहरात २, ग्रामीणला ३, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ८ रुग्ण आढळले. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार १७३, ग्रामीण १ लाख ४६ हजार १५६, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८३५ अशी एकूण ४ लाख ९३ हजार १६४ रुग्णांवर गेली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार २४०, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५२७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ हजार २०८ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ९७५ व्यक्ती इतकी झाली.

६९ सक्रिय रुग्ण

करोनामुक्तांहून नवीन रुग्ण वाढल्याने मध्यंतरी सक्रिय रुग्णसंख्या ७९ वर पोहोचली होती. परंतु गेल्या दोन दिवसांत नवीन रुग्णांहून करोनामुक्त वाढले. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४०, ग्रामीण २६, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशी एकूण ६९ रुग्ण नोंदवली गेली.

विदर्भात २४ नवीन रुग्ण

विदर्भात २४ तासांत एका  रुग्णाचा मृत्यू झाला, तर २४ नवीन रुग्णांची भर पडली. गेल्या तीन दिवसांची आकडेवारी बघता नवीन रुग्णसंख्येत किंचित वाढ दिसत आहे. विदर्भात १४ सप्टेंबरला दिवसभरात २१ रुग्ण, १५ सप्टेंबरला २२ रुग्ण तर गुरुवारी दिवसभरात २४ रुग्ण आढळले. नवीन रुग्णांत नागपुरातील ८, चंद्रपूर ३, गडचिरोली २, यवतमाळ १, भंडारा १, अकोलातील ४, बुलढाणा ३, वर्धेतील २ रुग्णांचा समावेश आहे. अमरावती, गोंदिया, वाशीम या तीन जिल्ह्य़ांत एकही नवीन रुग्ण आढळला नाही.