मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी पदार्थाना अधिक मागणी;  उपवासाच्या पदार्थानाही खवय्यांची पसंती

महेश बोकडे, नागपूर</strong>

श्रावण महिन्यात शहरातील हॉटेलमध्ये मांसाहार आणि शाकाहार अशा दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थाचे ग्राहक निम्म्याने कमी झाले आहे. उपराजधानीत हॉटेल्समध्ये मांसाहारी पदार्थाना अधिक मागणी असते. परंतु हल्ली मांसाहारी पदार्थाची मागणी घटल्याने त्या तुलनेत शाकाहरी पदार्थाची मागणी किंचित जास्त दिसत आहे.

नागपुरात सुमारे १ हजार ५०० लहान- मोठे हॉटेल्स व रेस्ट्रॉरेन्ट आहेत, तर १,४०० च्या जवळपास बिअर बार अ‍ॅन्ड रेस्ट्रॉरेन्टही ग्राहकांना विविध सेवा देत आहेत. या रेस्ट्रॉरेन्टमध्ये कुठे फक्त शाकाहार तर कुठे मांसाहार व शाकाहार अशा दोन्ही प्रकारच्या आहाराची सोय आहे. ग्राहकांची मांसाहाराला पसंती जास्त असल्याने येथे मांसाहारी अन्नपुरवठा करणाऱ्या हॉटेल्स वाढत आहेत. शहरात सुमारे ६५ ते ७० टक्के ग्राहक मांसाहाराला तर ३० ते ३५ टक्के ग्राहक हे शाकाहारी खाद्यपदार्थ सेवन करण्याला पसंती देतात. परंतु श्रावण महिन्यात दोन्ही संवर्गातील ग्राहक हॉटेल्समध्ये येणे कमी झाले आहे.

सर्वाधिक फटका मांसाहार खाद्यपदार्थाना बसला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल्सचा व्यवसायही निम्म्यावर आला आहे.

भाजीपाला दरवाढीसह महागाईचाही फटका

शहरातील हॉटेल्सचा व्यवसाय निम्म्यावर आला असतानाच भाजीपाल्यासह इतर पदार्थाचे दर दुपटीने वाढल्याने हॉटेल्स व्यवसायिकांचा मन:स्ताप वाढला आहे. ते हॉटेल्समधील पदार्थाचे दर वाढलेल्या स्पर्धेसह इतर कारणांनी वाढवू शकत नाही. निश्चितच त्यामुळे या हॉटेल व्यवसायिकांचा खर्च वाढला असून काहींना ते झेपवत नसल्याचेही खुद्द काही व्यावसायिक सांगतात.

घरातील जेवणाहून थोडी वेगळी चव घेण्यासाठी ग्राहक हॉटेलमध्ये जेवणाला पसंती देतात. श्रावण महिन्यात निम्म्याने ग्राहक  कमी झाले असले तरी काहींनी उपवासाच्या विशेष थाळीसह नवीन प्रयोग करून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. वाढलेल्या महागाईनेही हॉटेल व्यवसायिकांना त्रास होत असला तरी लवकरच व्यवसाय वाढण्याची आशा आहे.

– हर्षल रामटेके, बीईंग फुडीज रेस्ट्रॉरेंट, नागपूर.