नागपूर :  उपराजधानीत सुरू असलेला ऑनलाईन देहव्यापार उघडकीस आणून गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिल्लीच्या दोन तरुणींची सुटका केली. पोलिसांनी तीन दलालांनाही अटक केली. रफिक ऊर्फ राज साहेबराव पठाण (१९) , आफताब ऊर्फ आर्यन शेख निजाम (२०) दोन्ही रा. अहमदनगर व सौरभ प्रमोद सुखदेवे (२८) रा. राजेंद्रनगर, हिंगणा रोड, अशी अटकेतील दलालांची नावे आहेत. या देहव्यापाराचा सूत्रधार रमजान पठाण ऊर्फ रेहान दादा पठाण हा आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रमजान हा नागपूर एक्सॉर्ट  सव्‍‌र्हिस या वेबसाईटवरून देहव्यापारासाठी तरुणी पुरवत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना मिळाली. राजमाने यांनी तरुणीची सुटका करुन दलालांना अटक करण्याचे निर्देश दिले. राजमाने यांच्या मार्गदर्शनात सामाजिक सुरक्षा विभागाच्या निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष खेडकर, साधना चव्हाण, छाया, सीमा बघेल यांनी मनीषनगर भागात सापळा रचला. तीन दलालांना अटक करून दोन तरुणींची सुटका केली. एक महिन्यांपूर्वी दोघीही दिल्लीहून नागपुरात आल्या. सूत्रधार रमजान हा कुख्यात असून, त्याचे जाळे, मुंबई, औरगाबाद, अमरावती व अकोलापर्यंत असल्याची माहिती आहे.रमजान याच्याविरुद्ध नागपुरात यापूर्वीही देहव्यापाराचे गुन्हे दाखल आहेत.