वर्धा रोडवर तणाव, वाहतूक विस्कळीत

वर्धा रोडवरील डोंगरगाव शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एक कार रस्ता दुभाजकावर आदळून १५ ते २० फूट उसळत विरुद्ध दिशेने  जाणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रकमधील दोघे जखमी झाले. रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास झालेल्या हा अपघात बघून परिसरात बघ्यांची गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता. वर्धा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

वंशपती शंकर पटेल (३०, रा.रिवा, मध्यप्रदेश), आनंद रामसिंग पारधी (२३, खापरी पुनर्वसन कॉलनी), बंटी उर्फ चंद्रशेखर जयचंद चव्हाण (२४, खापरी पुनर्वसन कॉलनी), रवी रहांगडले (लवादा, तह. लालबर्रा, जि. बालाघाट, मध्यप्रदेश) अशी मृतकांची नावे, तर राकेश बालाजी शंभरकर (३५, दिघोरी) आणि पंकज, अशी ट्रकमधील दोघे जखमींची नावे आहेत. मृत्यू झालेले चारही तरुण मित्र असून ते एका चारचाकी वाहनने बुटीबोरी ते नागपूरच्या दरम्यान प्रवास करत होते. त्यांचे वाहन डोंगरगाव शिवारात असतांना अचानक वाहनचालक आनंदचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हे वाहन रस्ते दुभाजकावर आदळताच ते १५ ते २० फूट उसळून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दिनशॉ या दुधाच्या टँकरवर जोरात आदळले.

ट्रकचाही वेग जास्त असल्याने या कारचे इंजिन व इतर भाग वेगवेगळे होत ते दूरवर फेकले गेले. या घटनेत ट्रकही उलटून रस्त्याने अनेक फूट घासत गेला.

हा प्रकार बघून नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारमधील रक्ताच्या थारोळ्यातील चौघांसह ट्रकमधील दोघांना तातडीने नागपूरच्या मेडिकलमध्ये हलवले. ही सूचना पोलिसांनाही देण्यात आली. रस्त्यावर बघ्यांची गर्दी वाढल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मेडिकलमध्ये रुग्णांची तातडीने तपासणी करण्यात आल्यावर चौघांना मृत घोषित करण्यात आले. ट्रकचालक राकेश शंभरकरच्या पायाचे हाड मोडले, तर त्याचा सहकारी पंकजच्या छातीला किरकोळ मार लागला असल्याने त्याला सुटी देण्यात आली. ही माहिती मृतांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी संध्याकाळी मेडिकलचे शवविच्छेदनगृह गाठले, परंतु हा विभाग बंद झाल्याने त्यांना मृतदेह बघताही आले नाहीत.

या नातेवाईकांना अश्रू अनावर झाल्याने उपस्थितांमध्येही हळहळ व्यक्त केली जात होती.

घरी जेवायला आलो अन् दुर्लक्षाने चौघांना गमावले

अपघात झालेले चारचाकी वाहन गिरीश घोडेस्वार यांच्या मालकीची असून त्यावर राजेश परमानंद बोपचे (२७, रा. खापरी पुनर्वसन कॉलनी) हा चालक आहे. राजेश शनिवारी मध्यरात्रीनंतर घरी चारचाकी वाहन घेऊन जेवायला आला. त्याचा मामभाऊ आनंदने वाहनात पेट्रोल भरून आणण्याच्या बहाण्याने कारची चाबी घेतली, तर चंद्रशेखर यानेही नागपूर मेट्रोच्या प्रकल्पात थोडे काम असल्याने तेथे जाऊन येण्याची परवानगी राजेशकडून घेतली. मात्र, अपघाताची माहिती दुपारी कळल्यावर राजेशने धाव घेत संध्याकाळी मेडिकलचे शवविच्छेदनगृह गाठले. पोलिसांना बयाण देतांना त्याने ही माहिती दिली.