29 September 2020

News Flash

भाजप-काँग्रेसमध्ये जनसंवादात खडाजंगी!

विरोधी पक्षातील नगरसेवकांना पक्षपाती वागणूक

पालकमंत्र्यापुढे मुद्दे मांडताना काँग्रेस नगरसेवक.

फलकावरील भाजप नेत्यांच्या छायाचित्रावर आक्षेप;विरोधी पक्षातील नगरसेवकांना पक्षपाती वागणूक

नागपूर : धरमपेठ झोनमधील पालकमंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमासंदर्भातील फलकावर केवळ भाजप नेत्यांचीच छायाचित्रे पाहून हा कार्यक्रम महापालिकेचा की भाजपचा, असा प्रश्न काँग्रेस नगरसेवकांनी उपस्थित करत कार्यक्रमात गोंधळ घातला. यावेळी या नगरसेवकांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना बोलावले जात नसल्याचा आरोप केला. या मुद्यावरून भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी उडाली.

काँग्रेसचे नगरसेवक दर्शना धवड, कमलेश चौधरी, हरीश ग्वालवंशी,  भाजपकडून आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह भाजपच्या काही नगरसेवकांनी बाजू लावून धरली.

धरमपेठ झोनमध्ये सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनसंवाद (जनता दरबार)कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू होताच काँग्रेसचे नगरसेवक दर्शना धवड, कमलेश चौधरी, हरीश ग्वालवंशी यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांसह सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात नसल्याचा आरोप केला. कार्यक्रमासाठी महापालिका सगळा खर्च उचलत असताना जनसंवादाच्या फलकावर महापालिकेचा लोगो, विरोधी पक्षनेत्याचे छायाचित्र, आयुक्तांचे नाव का नाही. केवळ भाजप नेत्यांचीच छायाचित्रे व नाव का, असा सवाल केला. पालकमंत्र्यांनी प्रथम सर्वाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्राप्त तक्रारीनंतर  चर्चेनंतर काँग्रस नगरसेवकांच्या तक्रारी ऐकण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार काँग्रेस नगरसेवकांना बोलावले. किशोर जिचकार यांच्यासह इतर काँग्रेस नगरसेवकांनी जनसंवादातून भाजप प्रचार करीत असल्याचा आरोप केला. कमलेश चौधरी यांनी नगरसेवकांना प्रभागातील भूमिपूजन कार्यक्रमाला बोलावले जात नाही, कार्यक्रम पत्रिकांवर विरोधी पक्षातील नगरसेवकांचे नाव टाकले जात नाही, विकासासाठी निधी दिला जात नाही आदी आरोप  केले. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप हरीश ग्वालवंशी यांनी केला. त्यावर प्रतिउत्तर देताना भाजपचे आमदार सुधाकर देशमुख यांनी काँग्रेस नगरसेवक त्यांच्या वार्डातील भूमिपूजनाला आमदारांना  बोलावत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना

बोलावत नाही, असे स्पष्ट केले. शेवटी काँग्रेस नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालत येथून निघून गेले.

आमदाराकडून एकाच कामाचे ३ वेळा भूमिपूजन

आमदार सुधाकर देशमुख यांनी दाभा परिसरातील एका रस्त्याचे तीन वेळा भूमिपूजन केले, असा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. आमदार देशमुख यांनी याचे खंडन केले. डांबरीकरण व नंतर नवीन रस्त्याचे तसेच सिमेंट रस्ता मंजूर केल्यावर पुन्हा भूमिपूजन केल्याचे मान्य केले.

नागरिकांना दूषित पाणी

गिट्टीखदान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधींना मिनरल वॉटर दिले जात असल्याचा आरोप नागरिक रिजवान खान रुकमी यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:18 am

Web Title: row in congress bjp leaders over neglecting councilors in bhumi pujan programs
Next Stories
1 गडकरींनी आश्वासन देऊनही मासळी बाजाराला जागा नाही
2 पर्यावरणपूरक कटलरीचा वापर केवळ २० टक्केच!
3 …तर मेघे पितापुत्रांचे पुतळे जाळू; तेली समाजाचा भाजपाला इशारा
Just Now!
X