संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थीना अनुदान वाटप करताना काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची जबाबदारी ही यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीवरील शासकीय अधिकाऱ्यांसोबतच शासन नियुक्त अशासकीय सदस्यांवर टाकण्यात आली आहे. या समितीवर सदस्य नियुक्त करतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

संजय गांधी निराधार योजनेतून निराधारांना अनुदान दिले जाते. याचे लाभार्थी ठरविण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाते. यात शासकीय आणि अशासकीय अशा दोन्ही प्रकारचे सदस्यांची नियुक्ती केली जाते. अशासकीय सदस्यांची नियुक्ती पालकमंत्र्यांकडून केली जाते. हे पद राजकीय असल्याने आतापर्यंत त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नव्हती. मात्र लाभार्थीच्या निवड प्रक्रियेत त्यांचे मत ग्राह्य़ धरले जात होते. सरकारने या नियमात दुरुस्ती केली आहे. लाभार्थीची फारस ही समिती करीत असेल आणि लाभार्थी चुकीचा निवडला गेला असेल तर त्यांची जबाबदारी ही शासकीय सदस्यांसोबतच अशासकीय सदस्यांवरच असेल, अशी त्यात तरतूद करण्यात आली. त्यासंदर्भातीतल आदेशही निर्गमित करण्यात आले. तसेच समितीवर वाढीव सदस्य नियुक्तीचाही निर्णय घेण्यात आला. अलीकडेच नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहर आणि जिल्ह्य़ातील संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर अशासकीय सदस्यांसाठी नावाची शिफारस केली आहे. त्यानुसार या सदस्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत. या  नियुक्तया करतानाच जबाबदारीची जाणीव जिल्ह्य़ाधिकाऱ्यांनी सदस्यांना करून दिली आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील पूर्व नागपूरसाठी गजानन अंतूरकर, शोभा पटेल, तुळशीराम रहाटे, पश्चिम नागपूरसाठी कमलेश पांडे, कल्पना पझारे, अभय तिडके, उत्तर नागपूरसाठी गुड्डू केवलरामानी, हिरालाल रंगारी, प्रतीम गजभिये, दक्षिण-पश्चिम नागपूरसाठी सुनील दांडेकर, मयुर सांडे, सचिन भगत, दक्षिण नागपूरसाठी नसरीन शमीन अन्सारी, कृष्णकुमार जैस आणि मधुकर पाठक यांचा समावेश आहे. मध्य नागपूरसाठी राजेश बहादुरे, अतुल लांजेवार, वामन पारवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात काटोल तालुक्यासाठी प्रशांत श्रीपतवार, प्रशांत रिधोरकर, महादेव अडकिने, नरखेडसाठी प्रशांत लुंगे, राजेंद्र जुमगडकर, श्रीपातराव भजन, सावनेर तालुक्यासाठी विश्वास ठाकरे, खेमराज बारापात्रे, सुधार बंड, कळमेश्वर तालुक्यासाठी प्रकाश ठाकूर, हरिदास खरबडे, शेषराव जिचकार, कामठी तालुक्यासाठी निकेश कातुरे, नरेश मोहंबे, खेमराज हटवार, मौदा तालुक्यासाठी ईश्वर भागलकर, प्रशांत भुरे,

खुशाल डुमनखेडे, उमरेड तालुक्यासाठी राजीव ढेंगरे, प्रमोद लुटे, नारायण नेवारे, कुही तालुक्यासाठी अशोक भोयर, तिमा सहारे, नारायण धोटे, भिवापूर तालुक्यासाठी दिनेश तिमांडे, देवराव जगताप, नत्थुजी गुरुपडे आणि नागपूर ग्रामीण तालुक्यासाठी अशोक बाबूल, वर्षां डेंगे, नारायण कापसे आदींचा समावेश आहे.

  • निराधार योजनेतील गैरप्रकार
  • वाढीव सदस्यांच्या नियुक्त्या

जबाबदारी निश्चित

विशेष सहाय्य कार्यक्रमातील विविध योजनेतील अर्जदाराचे अर्ज मंजूर करताना गैरव्यवहार झाल्यास, लाभार्थी अपात्र ठरल्यास शासकीय सदस्यांप्रमाणेच अशासकीय सदस्यांनाही जबाबदार धरले जाईल.

सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, नागपूर