News Flash

घराजवळील विलगीकरण केंद्रामुळे करोनावर नियंत्रण शक्य

मुख्य म्हणजे, आपली मानसिकता विलगीकरणात राहण्याची नाही.

|| प्रशांत देशमुख

शल्यचिकित्सक डॉ. संदीप श्रीवास्तव यांचे मत

वर्धा : भारतीय हे उत्सवप्रिय व समाजशील आहेत. कठोर विलगीकरण हा त्यांच्यासाठी उपाय ठरू शकत नाही. घरालगत विलगीकरण केंद्राचा उपाय अंमलात आणल्याखेरीज करोनावर नियंत्रण शक्य नाही, असे मत प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी नोंदवले आहे.

बाधित पण सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णास घरीच विलगीकरणात ठेवण्याचे धोरण आहे. मात्र नागरिक विलगीकरण टाळत असल्याने संक्रमण वाढत असल्याची शासनाची धारणा झाली. या पार्श्वभूमीवर विलगीकरणातील रुग्ण बाहेर फि रताना आढळल्यास त्याला दोन ते दहा हजार रुपयाचा दंड राज्यात  आकारला जातोे. दंड परवडला पण विलगीकरण नको, अशा मानसिकतेतील रुग्णांना आवर घालणे हे एक कठीण ठरत आहे. सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयाचे करोना केंद्र मार्गदर्शक व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’ला  सांगताना काही अभिप्राय नोंदवले आहे. गत ३५ वर्षांपासून वैद्यकीय श्रेत्रात कर्यरत डॉ. श्रीवास्तव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पाक्षिकांमध्ये लेखन करतात.

डॉ. श्रीवास्तव म्हणतात की, करोनाने एक मोठा धडा आपल्याला शिकवला आहे. आरोग्याच्या सोयी घरापासून दूरवर असणे निरुपयोगी ठरतात. प्राथमिक उपचाराच्या सोयी जवळपास नसल्याने करोना आवाक्याबाहेर गेला आहे. तसेच आपले राहते घर विलगीकरणासाठी योग्य पर्याय ठरू शकत नाही. स्नानघर व अन्य कामासाठी कुटुंब एकत्रच असते.

मुख्य म्हणजे, आपली मानसिकता विलगीकरणात राहण्याची नाही. तरीही विलगीकरणाचे दडपण या काळात आले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने निवासी परिसरातच सार्वजनिक किंवा खासगी इमारत ताब्यात घेऊन विलगीकरणाची सुविधा देण्यात यावी. रुग्ण तपासणीची व्यवस्था स्थानिक पातळीवरच हवी. अधिकाधिक रुग्ण आढळणाऱ्या क्षेत्राला प्रतिबंधित करून त्याच ठिकाणी करोना केअर केंद्र सुरू करावे. त्याच परिसरातील स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरगुती जेवण, कपडेवगैरे सुविधा पुरवावी. यामुळे वेगळे पडल्याची भावना दूर होईल. अशा व्यवस्थेतील रुग्णास जुजबी स्वरूपाचे काम द्यावे. ऑनलाईन शैक्षणिक व कामाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. संक्रमणाची भीती दूर करणे आवश्यक आहे. करोनाला भिऊ नका, उपायांचा अंमल करा, असा संदेश देण्याची गरज असल्याचे डॉ. श्रीवास्तव म्हणतात.

विसावे शतक जिवाणूंचे तर एकविसावे शतक विषाणूंचे राहणार, असे मत नोंदवत डॉ. श्रीवास्तव म्हणतात की करोनाच्या पार्श्वभूमीवर एकूणच आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देण्याची गरज आहे. दहा हजारांच्या लोकसंख्येत बाळ व माता उपचार तसेच विलगीकरणाची सोय असणारे केंद्र करावे.

रोगनिदान प्रयोगशाळेची सोय  आवश्यक ठरते. प्राथमिक पातळीवर रोगाचे निदान होणे अनिवार्य आहे. करोनाने दूरध्वनी माध्यमातून वैद्यकीय सल्याचा पर्याय पुढे आणला. पण त्याला भारतीय मन सरावलेले नाही.

दहा हजार लोकसंख्येमागे ५० डॉक्टर, १५० परिचारिका, १०० खाटा अशी व्यवस्था निर्माण होईल तेव्हाच सर्वसाधारण मृत्यूदर खाली येईल. करोनाचे संकट आल्यावर आपण ऑक्सिजन पाईप व व्हेन्टीलेटर खाटांसाठी लगबग करू लागलो. ही व्यवस्था पूर्वीच अपेक्षित होती. आताही वेळ गेलेली नाही. विषाणू लवकरच लुप्त होणारा नाही. म्हणून पूर्ण तयारीनिशी या विरोधातील युद्ध लढण्यास सज्ज व्हायला हवे. वैद्यकीय क्षेत्र हे आगामी काळातील रोजगाराचे सर्वात मोठे साधन ठरणार आहे.

या क्षेत्रात केवळ डॉक्टरच हवे असे नसून औषधी निर्माणशास्त्र, प्राथमिक उपचार, संशोधक, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळ, वित्तीय व्यवस्थापन, शुश्रूषा, वैद्यकीय यंत्र हाताळणी व अन्य स्वरूपात मनुष्यबळाची गरज भासणार आहे. रोजच रोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध करून देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राचा युवकांनी अवश्य विचार करावा, असे आवाहनही डॉ. श्रीवास्तव यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 1:34 am

Web Title: separation center near the house makes it possible to control the corona akp 94
Next Stories
1 पारंपरिक शेतीला नवा पर्याय व संशोधन स्वीकारणे आवश्यक
2 यंदा एप्रिल-मे अधिक दाहक
3 वाझेचे सगळेच मालक चिंतेत!
Just Now!
X