पूर्व विदर्भात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करोनाचा उद्रेक झाला होता. या स्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून रुग्णसेवा केली. ही धडपड करताना आजपर्यंत येथे १ हजार ७११ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची  बाधा झाली. त्यातील आठ डॉक्टरांसह १७ जणांचा मृत्यू झाला.

पूर्व विदर्भात सर्वाधिक करोनाचे रुग्ण व मृत्यू नागपूर जिल्ह्य़ातील होते. आजपर्यंत नागपूर जिल्ह्य़ात सर्वाधिक ५८९ आरोग्य कर्मचारी करोनाग्रस्त झाले व त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांमध्ये नागपूर शहरातील ४३९ तर ग्रामीणच्या १५० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, पूर्व विदर्भात शासकीय रुग्णालयांतील १ हजार ३४१ तर खासगी रुग्णालयांतील ४११ असे एकूण १ हजार ७५२ आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना झाला. त्यात ६१५ डॉक्टरांचा समावेश आहे. यातील ८ डॉक्टरांसह एकूण १७ कर्मचारी दगावले आहेत. पूर्व विदर्भात ३४१ परिचारिका आणि ७९६ इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही करोनाने विळख्यात घेतले. सुदैवाने दगावणाऱ्यांत एकही परिचारिका नाही. परंतु ९ इतर  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पूर्व विदर्भात खासगी रुग्णालयांतील  सर्वाधिक ६ तर  शासकीय रुग्णालयांतील २ डॉक्टर दगावले. या आकडेवारीला आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

करोनाबाधित आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती

(खासगी व शासकीय रुग्णालयांतील..)

जिल्हा  बाधित  करोनामुक्त  मृत्यू

भंडारा  १६३ १५७ ०३

गोंदिया  २२३ २१४ ०४

चंद्रपूर  ५१६ ५१३ ०३

गडचिरोली   १७५ १६१ ०२

नागपूर (ग्रा.) १५० १५० ००

नागपूर (श.) ४४४ ४३९ ०५

वर्धा ०८१ ०७७ ००

एकूण   १,७५२  १,७११  १७