उपराजधानी नागपूरमध्ये पोलिसांच्या आशीर्वादाने अमली पदार्थाचा गोरखधंदा फोफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पोलीस आयुक्तांनी सहा पोलिसांना निलंबित केले. त्यात चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

कुख्यात अमली पदार्थ तस्कर आबू खानशी असलेल्या संबंधांवरून त्यांना निलंबित करण्यात आले. मध्य भारतातील कुख्यात अमली पदार्थ तस्कर आबू याला दोन आठवडय़ांपूर्वी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केली होती. तत्पूर्वी त्याच्या दोन साथीदारांना पकडून पोलिसांनी तीन लाखांचे एमडी पावडर जप्त केले होते. गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच आबूच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याला पोलीस विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरदहस्त लाभल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आबू व पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क तपासला. यात धक्कादायक माहिती समोर आली. हुडकेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश पुरभे, सक्करदरा येथील उपनिरीक्षक मनोज ओरके, तहसीलमधील शरद सिकने आणि साजीद मोवाल हे चार पोलीस उपनिरीक्षक आबूच्या सतत संपर्कात होते. पोलीस कर्मचारी जयंता सेलोट आणि श्याम मिश्रा या दोघांचे आबूच्या मोबाईलमध्ये वारंवार कॉल्स आढळले. सर्व पोलीस अधिकारी अमली पदार्थाच्या तस्करीत आबूला अप्रत्यक्ष सहकार्य करीत असल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.

सेलोट सहा महिन्यात दुसऱ्यांदा निलंबित

जयंता सेलोट गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा निलंबित झाला आहे. यापूर्वी आबूच्या वाढदिवसाच्या पार्टीत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जयंताला निलंबित करण्यात आले होते. तो आबूच्या  वारंवार संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले.