दाट लोकवस्तीमुळे उपाययोजनांच्या अंमलबजावणीत अडचण

नागपूर :  करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे सील करण्यात आलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरा या जुन्या व दाट वस्त्यांची रचना सामाजिक अंतर पाळण्यासाठी प्रतिकूल असल्याने तेथील नागरिकांनी या प्रतिबंधात्मक उपाय योजनेला फाटा दिला आहे.

या भागातील छोटी-छोटी घरे, एकाच घरात पाचच्यावर लोकांचे राहणे या बाबी सामाजिक अंतर पाळण्यात अडचण ठरत आहेत.

मोमीनपुरा व  सतरंजीपुरा या अनुक्रमे मध्य व पूर्व नागपूरमध्ये येणाऱ्या वस्त्यांना सील करण्यात आले आहे. या भागात कडेकोट बंदोबस्त आहे. जुन्या नागपूर परिसरात असलेल्या या दोन्ही वस्त्यांना शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असून या भागातील लोकांची घरेही दाटीवाटीने आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये प्रभाग २१ मघ्ये बडी मशीद, कंटेनमेंट एरिया उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्स, दक्षिण-पश्चिमेस जुना मोटार स्टँड चौक, उत्तर-पश्चिमेस मारवाडी चौक टी पॉईंट हा सर्व भाग बंद करण्यात आला आहे.  ६७ हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात  १२ हजार कुटुंब राहतात. बहुतांश भाग मुस्लीमबहुल आहे. घरे लहान व कुटुंब मोठी  अशी स्थिती आहे. तशीच परिस्थिती मोमीनपुरा भागात आहे. तेथील तकिया दिवानशहा, तीन खंबा चौक, नालसाहब चौक, भगवाघर चौक, जामा मशीद परिसर सील करण्यात आला आहे. या भागात अडीच हजार घरे असून  लोकसंख्या १६ हजार आहे. साधारणत: एका कुटुंबात १० ते १२ सदस्य आहेत आणि दोन खोल्यांमध्ये त्यांचा निवास आहे. त्यात मोमीनपुरा भागातील या वस्त्यामध्ये अनेक घरे गल्लीबोळात एकमेकाला लागून आहे.

आवश्यक सेवा बंद केल्याने नागरिक त्रस्त

करोनाची साथ संसर्गातून वाढते, त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. लोक बाहेर पडू नये म्हणून या भागातील आवश्यक सेवा बंद करण्यात आल्या आहे. मात्र यामुळे नागरिक त्रस्त झाले असून ते बाहेर पडू लागले आहे.