टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद विदर्भातील नेत्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, वाशिमचे पालकमंत्रीपद अजूनही सातारा जिल्ह्य़ातील शंभुराजे देसाई यांच्याकडेच ठेवण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री सुनील केदार यांच्याकडे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्य़ाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्य़ातील सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद होते तर ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्हा देण्यात आला होता. या जुन्या निर्णयात अंशत बदल करण्यात आला आहे. उर्वरित पालकमंत्रीपदाच्या नेमणुकांमध्ये बदल झालेला नाही.
टाळेबंदीच्या काळात जिल्ह्य़ातील नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन करणे सोईचे व्हावे म्हणून विदर्भातील नेत्यांकडे या दोन्ही जिल्ह्य़ाचा कारभार देण्यात आला.
विदर्भातील नेत्यांकडे पालकमंत्रीपद द्यायचे होते तर वाशिम जिल्ह्य़ाचे देखील पालकमंत्री स्थानिक नेत्याकडे द्यायला हवे होते. टाळेबंदीच्या काळात या जिल्ह्य़ातील अंघटित कामगार, शेतमजुरांना धान्य आणि इतर मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे. मात्र, शंभुराज देसाई हे तर जिल्ह्य़ात आलेच नाहीत. त्यामुळे याही जिल्ह्य़ाचा कारभार पश्चिम विदर्भातील नेत्यांकडे द्यायला हवा, अशी मागणी स्थानिकांची आहे.
*नागपूर – डॉ. नितीन राऊत
* वर्धा – सुनील केदार
* भंडारा -सुनील केदार (सतेज पाटील)
* गोंदिया -अनिल देशमुख
* चंद्रपूर-विजय वडेट्टीवार
* गडचिरोली -विजय वडेट्टीवार (एकनाथ शिंदे )
* अमरावती – अॅड. यशोमती ठाकूर
* अकोला -बच्चू कडू
* वाशिम -शंभुराजे देसाई
* बुलढाणा -डॉ. राजेंद्र शिंगणे
* यवतमाळ – संजय राठोड
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 12:55 am