कोळसे पाटील यांच्या वक्तव्यानंतर गिरीश व्यास यांची मागणी

नागपूर : संसदेत मंजूर नागरिकता संशोधन कायद्याविरोधात (सीएए) काही जण आक्षेपार्ह विधानातून समाजात द्वेष निर्माण करत आहेत. रविवारी जाफरनगरच्या कार्यक्रमात सेवानिवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील यांनीही असेच विधान केले.  त्याबाबत चलचित्रासह शहर पोलीस आयुक्तालयात भाजपने सोमवारी तक्रार दिली आहे. यातील दोषींसह शहरात ४५ हजारांवर असलेल्या अनधिकृत घुसखोरांवरही शासन व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी केली.

टिळक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यास म्हणाले, सीएएद्वारे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, बौद्ध, पारशींसह इतरांना नागरिकता मिळणार असून कुणाचीही नागरिकता जाणार नाही. त्यानंतरही काही राजकीय पक्ष व व्यक्ती मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. कोळसे पाटील यांनीही असल्या प्रकारचे आक्षेपार्ह विधान सोमवारी केले. ते सेवानिवृत्त न्यायाधीश असल्याने त्यांना काहीही बोलता येत असल्याचे त्यांना वाटत असावे. हा प्रकार चुकीचा आहे, असेही व्यास म्हणाले.