व्यस्त बैठकांमधून वेळ काढून फटाके घेऊन दिले
नितीन गडकरी या नावाच्या सभोवतालच व्यस्ततेचे वलय आहे. सकाळी नागपूर, दुपारी दिल्ली आणि सायंकाळी देशातले कुठले तरी तिसरेच राज्य असा रोजचा त्यांचा बदलता दिनक्रम असतो. सतत बैठका, चर्चा, सभा अन् त्यासाठी होणारा निरंतर प्रवास यातून कुटुंबीयांना द्यायला गडकरींकडे फारसा वेळ नसतोच, परंतु हट्ट लाडक्या नातवाचा असेल तर मात्र कणखर राजकीय नेत्याआड दडलेला संवेदनशील आजोबा हळवा होतो आणि नातवाच्या हट्टाला प्राधान्य देतो. याची प्रचिती शुक्रवारी पुन्हा नव्याने आली.
दिवाळी असल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या पाच-सहा दिवसांपासून नागपुरातच मुक्कामी आहेत. या मुक्कामातही त्यांचे निरंतर कार्यक्रम सुरू आहेत. याच क्रमात आज शुक्रवारी इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनासंदर्भात गडकरी यांची हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पत्रपरिषद होती. परंतु त्यांचा नातू निनाद याला फटाके हवे होते. बैठकीची वेळ झाली पण, निनादचा हट्ट कायमच.
अखेर गडकरी हे त्याला सोबत घेऊनच पत्रकार परिषदेला निघाले. पत्रकार परिषद पूर्ण होतपर्यंत तो आजोबांसोबत संयम बाळगून बसला. पण, आजोबा आता मोकळे झालेत हे लक्षात येताच त्याने फटाक्याचा आग्रह धरला.
गडकरींनीही लगेच त्याचा हट्ट पुरवण्यासाठी थेट रामनगर गाठले. चौकातील एका फटाक्याच्या दुकानासमोर गडकरींचा ताफा थांबला. सर्वसामान्य आजोबांप्रमाणे गडकरींनी नातवाच्या आवडीचे फटाके वेगळे काढले, दुकानदाराला पैसे दिले आणि घराकडे परत वळले. रामनगर चौकात गडकरी नातू-आजोबांच्या या निरागस प्रेमाची नंतर बराच वेळ चर्चा सुरू होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 2:26 am