शिक्षक दिन विशेष

देवेश गोंडाणे

सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा मागासलेपण, नशेच्या आहारी गेलेले पालक, मजुरी करून घराला आर्थिक हातभार लावणारी आई.. अशा दाहक परिस्थितीत सापडलेल्या झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणारे शिक्षक म्हणजे प्रा. डॉ. नितीन कायरकर. नागपूर विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात आचार्य पदवी मिळवून समाजशास्त्राच्या अभ्यासाला सार्थकी लावण्याचे काम प्रा. कायरकर करीत आहेत. आजच्या शिक्षक दिनी त्यांच्या या कार्याला वंचितांच्या वस्तीत गौरवले जात आहे.

प्रा. कायरकर हे नागपूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात अंशकालीन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शिक्षणाच्या प्रवाहातून वेगळे पडलेल्या मुलांना व्हावा, असा विचार करून त्यांनी तीन वर्षांआधी दत्तवाडी झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तीन मुले शिकायला आली. झोपडपट्टीमध्ये बसायला जागाही मिळत नव्हती. मात्र, कशीबशी जुळवाजुळव करून प्रा. कायरकर यांनी लहान मुलांना जे आवडेल ते शिकवण्याचा आणि त्यांच्यातील अंतर्गत गुणांना फुलवण्याचा प्रयत्न केला. आज २६ मुले त्यांच्या ज्ञानयज्ञात सहभागी झाली आहेत. परिसरातील अनुदानित शाळेत शिक्षण घेणारी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांचा यात समावेश आहे.

अभ्यासासोबतच मुलांना ते स्वच्छतेचे धडे देतात. आरोग्याबाबत सजग करतात. इतर मुलांपेक्षा झोपडपट्टीतील मुले वेगळी नसतात. या मुलांमध्येही गुणवत्ता असते. केवळ योग्य संधी आणि वातावरणाचा अभाव इथे असतो, हे प्रा. नितीन यांच्या लक्षात आले.  अगदी सुरुवातीला मुलांचे आईवडील त्यांच्याकडे संशयाने बघत. चांगल्या घरचा मुलगा दिसते. याला काय आमच्या पोरांची इतकी पडलेली, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. मात्र, आज संशयाचे हे सगळे ढग विरले आहेत. या मुलांना  चित्रकला, मातीच्या मूर्ती तयार करणे, वाद्य वादन अशा गोष्टी प्रा. कायरकर शिकवतात. अंशकालीन तत्त्वावर प्राध्यापकाची नोकरी सांभाळून त्यांनी या मुलांच्या आयुष्याला मूर्तिकाराप्रमाणे घडवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.