शेकडो किलोमीटरच्या भटकंतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘जय’च्या गायब होण्याची तक्रार थेट राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेल्यावर त्याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला विचारणा झाल्याने वनखाते हादरले आहे. दरम्यान, ‘जय’ गायब नव्हे, तर त्याचा मृत्यू झाला असण्याची दाट शक्यता वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
नागझिरा अभयारण्याची शान असलेला ‘जय’ उमरेड-करांडला अभयारण्यात दाखल झाला तेव्हा या अभयारण्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हे अभयारण्य त्याच्याशिवाय अस्तित्वहीन झाल्याचे पर्यटकांमुळे उघडकीस आले. त्यावर अभयारण्य प्रशासनाला विचारल्यावर एक-दीड महिन्यापासून तो दिसतच नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात गेल्या चार महिन्यांपासून तो तेथे नाही. राष्ट्रीय महामार्गावर कित्येकदा वाटसरूंना दर्शन देणाऱ्या ‘जय’ची भटकंती शिकाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, हे लक्षात घेऊनच त्याला ९ महिन्यांपूर्वी ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली होती. ती घट्ट झाल्यामुळे तीन महिन्यापूर्वी ती बदलण्यात आली, पण त्याचेही ‘सिग्नल’ मिळणे बंद झाले. भारतीय वन्यजीव संस्थानच्या वैज्ञानिकांनी ‘हायटेन्शन लाईन’मुळे कॉलर खराब होते, हे दिलेले कारणच प्रश्न निर्माण करणारे आहे. कॉलरिंग करणारे वैज्ञानिक आणि उमरेड-करांडलाचे व्यवस्थापन सांभाळणारे पेंच प्रशासन हे दोघेही मॉनिटरिंग आणि संरक्षणात अपयशी ठरलेले आहे. ‘जय’च्या भरवशावर पेंच प्रशासनाने लाखो रुपयांची कमाई केली आणि त्याच्या सुरक्षिततेवर वनखात्याने तब्बल ७ लाखांचा खर्च केला. मात्र, त्याच ‘जय’च्या अस्तित्वाविषयी दोघेही अनभिज्ञ आहेत. पर्यटकांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय व पेंच प्रशासनाकडून सारवासारवीची उत्तरे दिली जात आहेत.

मुख्यमंत्री व वनमंत्र्यांना अंधारात ठेवून नसती उठाठेव
दरम्यान, चंद्रपूरच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार मानव-वन्यजीव संघर्ष व संशोधनासाठी वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचा कार्यक्रम आखण्यात आलेला असतांना त्याचा उपयोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्य़ात त्यांनाच अंधारात ठेवून मंत्रालयातील एका वरिष्ठ व्याघ्रप्रेमी अधिकाऱ्याच्या आग्रहास्तव केवळ पर्यटनासाठी केला जात आहे. ‘जय’ला याच उद्देशाने रेडिओ कॉलर लावण्यात आली. वन विभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या वतीने दोन संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यानुसारच पेंच, ताडोबा, उमरेड-करांडला, नागझिरा-नवेगाव व ब्रम्हपुरी वन विभागातील १५ तरुण वाघांना रेडिओ कॉलर लावण्याचे ठरले. त्यानुसार उमरेड-करांडला येथे ‘जय’ला कॉलर लावण्यात आली. मात्र, मंत्रालयातील एका व्याघ्रप्रेमी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आग्रहास्तव ताडोबातील वाघांनाही कॉलर लावण्यात आली. याउलट, मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या ब्रम्हपुरी वन विभागातील ६ पैकी केवळ दोनच वाघांना ती लावण्यात आली. जयला कॉलर लावल्यानंतर तेथे सचिन तेंडूलकर व ताडोबात शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांना मंत्रालयातील या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत: पर्यटनासाठी आणले. विशेष म्हणजे, उमरेड-करांडला व्याघ्र प्रकल्पाच्या प्रसिध्दीसाठी जयचा अतिशय पध्दतशीर वापर करण्यात आला. वनाधिकाऱ्यांच्या मदतीने अतिविशिष्ट पर्यटकांना वेळोवेळी त्याचे दर्शन घडविण्यात आले. सचिन तेंडूलकरला जयचे दर्शन घडविण्याची जबाबदारी चंद्रपूर व पेंचच्या उपवनसंरक्षकांवर सोपविण्यात आली होती. वास्तविक, कॉलर ही मानव-वन्यजीव संघर्ष व संशोधनासाठी लावलेली असतांनाही तिचा उपयोग मात्र मंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने पर्यटनासाठी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर ‘रेडिओ कॉलर’ खराब का झाल्या नाहीत?
भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक हबीब बिलाल यांनी ‘हायटेन्शन लाईन’खालून गेल्यामुळे ‘जय’ची ‘रेडिओ कॉलर’ खराब झाल्याचे कारण दिले आहे. पहिली कॉलरसुद्धा याच कारणामुळे खराब झाली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, या स्पष्टीकरणाने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. पहिली कॉलर या कारणामुळे खराब झाली तर, दुसरी कॉलर लावण्याआधी ‘हायटेन्शन लाईन’खाली नेऊन तिची तपासणी का करण्यात आली नाही? ‘हायटेन्शन लाईन’खालून ‘जय’ गेल्यामुळे कॉलर खराब झाली तर, इतर ‘रेडिओ कॉलर’ लावलेल्या वाघांच्या कॉलर का खराब झाल्या नाहीत?

आशिष ठाकरे म्हणतात..
माझ्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या एकाही ‘कॅमेरा ट्रॅप’मध्ये गेल्या चार महिन्यांपासून तरी ‘जय’चे छायाचित्र नाही. त्यामुळे तो माझ्या परिसरात आला, हे मी कसे म्हणू शकेल, असे ब्रम्हपूरी विभागाने विभागीय वनाधिकारी आशिष ठाकरे यांनी सांगितले.