दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा पराक्रम

नागपूर : करोनामुळे गेल्या वर्षभरात सांस्कृतिक कार्यक्रमास बंदी असताना दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने मात्र वर्षभरात ऑनलाईन कार्यक्रम सादर करत केवळ कलाकरांच्या मानधनावर चक्क पावणेचार कोटी रुपये खर्च केले असे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.

गेल्या वर्षभरापासून करोना महामारीमुळे राज्यात जाहीर सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी होती. त्यामुळे कुठेही सार्वजानिक कार्यक्रम सादर झाले नाही. या काळात केंद्राने मात्र ऑनलाईन कार्यक्रम करण्यावर भर दिला. गेल्या वर्षभरात स्थानिक कलावंतांसह राज्य व राष्ट्रीय पातळीवर कलावंतांचे एकूण १८८ ऑनलाईन कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात केवळ कलाकारांवर ३ कोटी ७९ लाख ९० हजार ५५६ रुपये म्हणजेच जवळपास पावणेचार कोटी खर्च करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात केंद्राला विचारलेल्या माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे.

दक्षिण मध्य क्षेत्र  सांस्कृतिक केंद्राला गेल्या वर्षभरात केंद्र सरकारकडून ८ कोटी २९ लाख ४३ हजार निधी मिळाला. गेल्या वर्षभरातील ऑनलाईन कार्यक्रमात तीन हजार कलाकार सहभागी झाले होते. त्यात कलाकारांवर १ कोटी ३७ लाख ८१ हजार ५०९ रुपये खर्च झाले आहे. मात्र यात मोठय़ा कलावंतांना किती रक्कम देण्यात आली याची माहिती मात्र केंद्राकडून देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरात एकही सांस्कृतिक कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला नसल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला. केंद्राकडून

स्थानिक पातळीवर होत असलेल्या ‘ब्रम्हानंद’ या कार्यक्रमावर २ लाख ५५ हजार ४००, तर वसंतराव देशपांडे स्मृती समारोहावर ६ लाख ८५ हजार ६७१, संगीत प्रभाकर संगीत समारोहावर १ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली.

एकीकडे कार्यक्रमाच्या माध्यमातून काही कलावंतांवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना विदर्भातील ग्रामीण भागातील व शहरातील अनेक लोककलावंत व इतर कलामधील नवोदित कलावंत सध्या करोनामुळे आर्थिक संकटात आहेत. यामुळे केंद्राने अशा कलावंतांना आर्थिक मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांवरील खटल्यासाठी अडीच लाख खर्च!

कर्मचारी  किंवा इतर बाबींसंदर्भात केंद्राच्या विरोधात न्यायालयात एकूण १२ खटले सुरू आहेत. कर्मचाऱ्यांवर १ खटला सुरू आहे. यासाठी वकिलांची फी म्हणून केंद्राकडून २ लाख ६ हजार ७५० रुपये खर्च करण्यात आले असल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.