मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई या नावात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असून ते नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील पाटील यांनी विधान परिषदेत दिले.
मुंबईतील सीएसटी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी नाव वापरण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असून दोन्ही ठिकाणच्या नावांमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी विनायक मेटे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्यावर विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनीही सरकारने हा विषय गंभीरतेने घेण्याच्या सूचना केल्या. रेल्वेस्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्राच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.