महेश बोकडे

ऐन करोना काळात राज्यभरात पहिल्या फळीत बाधितांवर उपचार करणाऱ्या पदव्युत्तरच्या तृतीय वर्षांतील अडीच ते तीन हजार निवासी डॉक्टरांनी शासनाने थट्टा चालवली आहे. या डॉक्टरांना मे महिन्यात शासनाने दोन महिने रुग्णसेवेसाठी मुदतवाढ दिली. परंतु या काळातील मासिक दहा हजार वाढीव विद्यावेतन देण्यास शासन नकार देत आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्ये संताप आहे.

करोनाचे संक्रमण सुरू झाल्यावर राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत शासनाने कोविड रुग्णालये उभारले. या रुग्णालयांत पहिल्या फळीत २४ तास निवासी डॉक्टर थेट बाधित रुग्णांपर्यंत जाऊन उपचार करत होते. दरम्यान, तृतीय वर्षीच्या पदव्युत्तरचे निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक सत्र मे २०२० मध्ये संपत होते. या काळात सर्वत्र बाधितांची संख्या वाढत असल्याचे बघत या डॉक्टरांच्या सेवेला शासनाने दोन महिने मुदतवाढ दिली. याचवेळी शासनाने निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन मे महिन्यापासून प्रतिमाह १० हजार रुपयांनी वाढवले. त्याचा लाभ तृतीय वर्षीच्या मुदतवाढ दिलेल्या निवासी डॉक्टरांनाही अपेक्षित होता. परंतु त्यांना वगळले गेले.

दरम्यान, सर्वच निवासी डॉक्टरांना सप्टेंबपर्यंत पूर्वीप्रमाणे जुन्याच रकमेचे विद्यावेतन मिळाले. परंतु नुकतेच पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या निवासी डॉक्टरांच्या खात्यात मे महिन्यापासूनची वाढीव दरमाह १० हजारांची तफावतीची रक्कम वर्ग झाली. ही रक्कम तृतीय वर्षीच्या मुदतवाढ दिलेल्यांच्या खात्यात आली नसल्यावर हा प्रकार समोर आला. त्यातच आता या डॉक्टरांचा जुलैपर्यंतचा मुदतवाढीचा कालावधी संपला आहे. परंतु या प्रकारामुळे ऐन करोना काळातील पहिल्या फळीत सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन

वैद्यकीय शिक्षण खात्याकडून पूर्वी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील पदव्यूत्तरच्या पहिल्या वर्षीच्या निवासी डॉक्टरांना महिन्याला ५२ हजार रुपये, द्वितीय वर्षांच्या निवासी डॉक्टरांना महिन्याला ५३ हजार ५००, तृतीय वर्षांच्या निवासी डॉक्टरांना महिन्याला ५५ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. परंतु शासनाने आता मे महिन्यापासून त्यात महिन्याला दहा हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे विद्यावेतन तेवढय़ाने वाढले आहे.

‘‘निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात केलेली मासिक दहा हजारांची वाढ नियमित पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसाठी होती. परंतु पदव्युत्तरच्या तिसऱ्या वर्षांतील मुदतवाढ मिळालेले निवासी डॉक्टर या निकषात बसत नाही. त्यामुळे त्यांना वाढ दिली गेली नाही.’’

– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

‘‘या निवासी डॉक्टरांनी करोनाच्या कठीण काळात थेट कोविड रुग्णालयांत वैद्यकीय सेवा दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्याने मुदतवाढ दिल्याने त्यांनी दोन महिने अतिरिक्त सेवा दिल्याने त्यांनाही या वाढीव विद्यावेतनाचा लाभ मिळायला हवा. या विषयावर सेंट्रल मार्डकडून वैद्यकीय शिक्षण खात्यासोबत चर्चा सुरू आहे.’’

– डॉ. अर्पित धकाते, मार्ड, मेडिकल, नागपूर.