केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध; सव्वा दोन कोटींचे नुकसान

खास प्रतिनिधी, नागपूर</strong>

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज मंगळवारी अंबाझरी दारूगोळा निर्मिती कारखान्यातील (ऑर्डनन्स फॅक्टरी)  तीन हजारांहून कर्मचारी रस्त्यावर उतरले. या आंदोलनामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले.

देशभरात ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाअंतर्गत ४१ दारूगोळा निर्मिती कारखाने आहेत. हे दारूगोळा कारखाने व नऊ  सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपन्या (डीपीएसयू) दरवर्षी सुमारे ५२ हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती करतात.  केंद्र सरकारने ‘बीएसएनएल’च्या धर्तीवर या कारखान्यांचे महामंडळात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये संताप आहे. हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी दारूगोळा निर्मिती कारखान्यातील कर्मचारी संघटनांनी मंगळवारी संप पुकारला. सकाळपासून  कारखाना परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. सकाळीच सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांपैकी तीन हजार कर्मचारी प्रवेशद्वारासमोर एकत्रित झाले. त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी काही कर्मचाऱ्यांना आत प्रवेश देण्यात आला. त्यासाठी कर्मचारी संघटनांनी पासेस दिल्या होत्या. अंबाझरीच्या आयुध निर्माणीतून वर्षांला सुमारे ८०० कोटींच्या शस्त्र व साहित्याचे उत्पादन होते. उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याचा दावा भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय संरक्षक श्रीराम बाटवे यांनी केला.

‘मेक इन इंडिया’च्या उलट स्थिती

ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन, इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तीन संघटनांच्या सोबतीला लोकशाही कामगार संघटना आणि इंटक संपात सहभागी झाली. एकीकडे सरकार ‘मेक इन इंडिया’ सांगते आणि दुसरीकडे दारूगोळा कारखान्यांचे खासगीकरण करीत आहे, असा   संघटनांचा आरोप आहे. आंदोलनात बीआरएमएसचे अध्यक्ष बंडू तिडके, सरचिटणीस ओ.पी. उपाध्याय, गिरीश काळे, बी.बी. मजुमदार, इंटकचे अरविंद सिंग, लोकशाही कामगार संघटनेचे वेदप्रकाश सहभागी झाले होते.

ही उत्पादने तयार होतात

या दारूगोळा कारखान्यात फ्युज, लष्करासाठी आवश्यक पूल, बॉम्बचे आवरण, कॅट्रीज केस, रॉकेट (अग्निबाण) तयार होतात.