आपल्या संरक्षित अधिवासातून अतिदूर भ्रमंती करणाऱ्या वाघांची उदाहरणे अलीकडच्या काळात दिसू लागली असून यवतमाळ जिल्ह््यातील एक वाघ सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून मराठवाड्यात पोहोचला आहे.

दोनच वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह््यातीलच एका वाघाने तब्बल तीन हजारांहून अधिक किमी प्रवास केल्याचे समोर आले होते. त्यामुळे वाघांच्या संचारमार्गाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे मोठे आव्हान वन खात्यासमोर निर्माण झाले आहे.

जून २०१९ मध्ये पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर येथून ‘टी१सी१’ हा वाघ स्थलांतरित झाला होता. त्याचे लांब अंतराचे स्थलांतरण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरले होते. आता दीड वर्षानंतर पुन्हा एका वाघाने मराठवाड्यात स्थलांतर केले. गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना सुरुवातीला वाघांच्या पाऊलखुणातसेच शिकारीचे पुरावे दिसून आले. या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आल्यावर १५ मार्चला वाघाचे छायाचित्र आढळल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल सात ते आठ दशकांनंतर या अभयारण्यात वाघाचे अस्तित्व आढळल्याने ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान अभयारण्य प्रशासनासमोर आहे.

वाघाचा प्रवास गावाच्या सीमेलगत झाला असावा, असा अंदाज वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी व्यक्त के ला. मात्र, यादरम्यान मानव-वन्यजीव संघर्षाची एकही घटना घडून आलेली नाही. तरीही सारख्याच मार्गाने दोन वाघांनी लांब अंतर कापल्याने या कॉरिडॉरचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

१९४० नंतर…

गौताळा अभयारण्यात बिबट्यांचा अधिवास आहे पण वाघाच्या पाऊलखुणा १९४० नंतर आता दिसून आल्या. पंधरा दिवसांपूर्वी खवल्या मांजरावरील संशोधन करताना तुषार पवार यांना वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले. त्याने ही बाब वन अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर कॅमेरा लावून नजर ठेवण्यात आली. त्याचे छायाचित्र कैद झाल्यानंतर तो वाघ कोठून आला याचा शोध सुरू झाला. आईपासून वेगळे झाल्यानंतर स्वत:चे क्षेत्र ठरविण्यासाठी त्याने हा प्रवास केला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हा भ्रमणमार्ग स्थलांतरणासाठी सुरक्षित ठरला आहे. त्यामुळे या वाघानेदेखील सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास के ला असावा.

– बिलाल हबीब, वैज्ञानिक, भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून

झाले काय?

यवतमाळहून ‘टी३सी१’ हा वाघ दोन हजार किमी प्रवास करून मराठवाड्यातील औरंगाबाद शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील गौताळा अभयारण्यात आला. पश्चिम घाटातील अजिंठा पर्वतरांगांमध्ये हे अभयारण्य आहे. १९४० नंतर या अभयारण्यात वाघाचे दर्शन झाले.

तीन अभयारण्ये पार…  टिपेश्वर अभयारण्यातून गौताळा अभयारण्यात स्थलांतरित होताना या वाघाने पैनगंगा, ज्ञानगंगा, काटेपूर्णा या अभयारण्याचा प्रवास केला.

संरक्षित अधिवास (कॉरिडॉरचे) महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वाघांच्या प्रभावी संचार व्यवस्थापनासाठी ते ओळखणे आणि त्याचे संवर्धन करणे आवश्यक झाले आहे.

– सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम

दक्षिण भारतातील व्याघ्र अधिवास, मध्य भारतातील आपल्याकडील व्याघ्र अधिवास व उत्तर भारतातील व्याघ्र अधिवास यांच्यामध्ये जंगलाची संलग्नता आता बहुतांश खंडित झाली आहे. त्यानंतरही वाघांचे लांबवर भ्रमण होत असल्याचे आढळून येत आहे.

– किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ