आज जागतिक शौचालय दिन; नागपूर विभागात गती, अमरावती विभाग पिछाडीवर; टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सचे सर्वेक्षण

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत २०१९ पर्यंत ‘हागणदारीमुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या राज्य शासनाच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकारची शौचालय बांधकामाची गती संथ असून ती वाढविण्याची गरज असल्याचे टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सने केलेल्या सव्‍‌र्हेत उघड झाले आहे. विदर्भाचा विचार करता नागपूर विभागात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याची गती चांगली असून २०१९ पर्यंत गडचिरोली वगळता नागपूर विभागातील इतर जिल्हे हागणदारीमुक्त करता येऊ शकतात. शौचालय बांधकामात अमरावती विभाग पिछाडीवर असल्याचे या सव्‍‌र्हेतून स्पष्ट होते.

केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत मिशन’ उपक्रम हाती घेतल्यावर १० ते ११ ऑगस्टदरम्यान टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेतर्फे संपूर्ण देशातील शौचालयांच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले. विदर्भातील ११ जिल्ह्य़ांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्ह्य़ातील किती घरांमध्ये शौचालये आहेत, याची आकडेवारी यातून समोर आली आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया येथे ७० टक्क्यांपेक्षा अधिक घरांमध्ये, तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ येथे ५० ते ६५ टक्के घरांमध्ये शौचालये बांधण्यात आली. अमरावती विभागातील बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्य़ात अद्याप ५० टक्के घरांमध्ये शौचालये बांधण्यातच आली नसून त्यांची टक्केवारी अनुक्रमे ४९.९ आणि ४७.५ अशी आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य सरकारने २०१९ पर्यंत ४२ महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यात ४५.१ लाख शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दर महिन्याला १ लाख ७ हजार ३०० शौचालये बांधण्याचे लक्ष्य पूर्ण व्हायला हवे, परंतु प्रत्यक्षात दर महिन्याला ७५ हजार ४०० शौचालये बांधण्यात येत असून २०१९ पर्यंत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकारला कामाची गती वाढविण्याची गरज असल्याचे दिसते.  न्यथा, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी २०२५ उजाडेल, असा अंदाज सर्वेक्षणात  व्यक्त करण्यात आला आहे.या सव्‍‌र्हेची प्रत राज्य सरकारला सादर करण्यात आली आहे.

untitled-7