गचाळ नियोजनाचा फटका – मोर्चेकऱ्यांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा

विधिमंडळ अधिवेशनावर धडकणाऱ्या मोर्चासाठी आलेल्या हजारो वाहनांमुळे सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. शहरातील विविध भागातून सीताबर्डीकडे येणारे व येथून विधानभवनाकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख मार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारनंतर ठप्प झाली होती. या गर्दीत शाळकरी मुलांचे ऑटो, बसेस इतकेच नव्हे तर रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकादेखील अडकल्या होत्या.
दरवर्षी अधिवेशनकाळात एकाच दिवशी अनेक मोर्चे निघतात, त्यातील हजारोंची उपस्थिती लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन केले जाते. यंदाही ते करण्यात आले. मात्र ते करताना पोलिसांचा अंदाज चुकला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी आदिवासी समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो समाजबांधव खासगी वाहनांनी आले होते. त्यांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. आज दुसऱ्या दिवशीही असाच प्रकार घडला. मंगळवारी काँग्रेस आणि धनगर समाज संघर्ष समितीचा मोर्चा होता. मागील वर्षी काँग्रेसच्या मोर्चाला गर्दी नव्हती. पण धनगर समाजाचा मोर्चा भव्य होता. यंदा दोन्ही मोर्चे एकाच दिवशी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाहने नागपुरात सकाळपासून दाखल झाली. त्यांच्यासाठी वाहनतळांची व्यवस्था सूनियोजित नसल्याने मिळेल त्या जागी ती उभे करण्यात आली. नेमकी हीचबाब वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरली. सीताबर्डी, रामदासपठे,धंतोली आणि विधिमंडळाकडे जाणाऱ्या इतरही प्रमुख मार्गांवर, त्याच्या उपरस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ झाले. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह शाळकरी मुले, रुग्ण व इतरांनाही बसला. त्यामुळे ते कमालीचे संतापले होते.
सकाळी ११ वाजतापासूनच वर्धा मार्गासह बजाजनगर, शंकरनगर, रामदासपेठ, भोले पेट्रोल पंप असे विधानभवनाकडे जाणारे प्रत्येक मार्ग तुंबायला लागले. दुपारी १२ वाजेनंतर मोर्चाला सुरुवात झाली आणि दोन्ही मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी झाले. वाहतूक विभागाला या दोन्ही मोर्चाचे नियोजन करता आले नाही आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.
विधानभवन परिसरातील भोले पेट्रोल पंप, सिव्हील लाईन्स, रेल्वे स्थानकाकडे जाणारे रस्ते, सीताबर्डी, रेल्वेस्थानक, रामझुला, रेल्वे उड्डाणपूल व परिसरातील मुख्य मार्गावरची वाहतूक अनियंत्रित झाली. मात्र, त्याचवेळी या मुख्य मार्गाना जोडणारा पंचशील चौकापासून आत जाणारे रस्ते, रामदासपेठचा रस्ता, धंतोली परिसरातील संपूर्ण रस्ते, शंकरनगर, दीक्षाभूमी परिसरातील पूर्ण रस्ते वाहतूकीने तुंबले होते. मोर्चेकऱ्यांची वाहने त्यांनी रस्त्याच्या कडेला दुहेरी लावल्यामुळे आणि त्यातच स्टार बसेस यामुळे वाहतूकीचा पुरता बोजवारा उडालेला होता. अजनी पुलावरुन वाहतूक सुरळीत असेल असे वाटत होते, पण अजनी पुलावरदेखील ‘ट्रॅफिक जाम’ झाले होते. धंतोलीत दुचाकी आणि चारचाकी वाहने एकमेकांना धडकल्याने वाहनचालकांमध्ये जुंपली आणि वाहतूक आणखी अनियंत्रित झाली. पंचशील चौकाकडून यशवंत स्टेडियमकडे जाताना मोर्चेकऱ्यांनीच वाहनचालकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडून आला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अध्रे शहर अनियंत्रित वाहतुकीच्या जाळयात अडकले असतानासुद्धा वाहतूक पोलीस कुठेही वाहतूक नियंत्रित करताना दिसून आले नाही.
धनगर समाज आणि काँग्रेसच्या मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता एकाच दिवशी या दोन्ही मोर्चाना परवानगी कशी दिली, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
पोलिसांचा अंदाज चुकला
एकाच दिवशी दोन मोठय़ा मोर्चाना परवानगी देताना पोलिसांचा अंदाज चुकला का? असा प्रश्न या निमित्ताने आता विचारला जात आहे.
सोमवारी झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेऊनही दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या दोन मोर्चाच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या हजारो वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करणे अपेक्षित होते. शाळेच्या वेळा ही लक्षात घेणे गरजेचे होते. प्रत्यक्षात अशी कुठलीही तयारी केली गेली नव्हती, हे फसलेल्या नियोजनातून दिसून आले. ही सर्व वाहने शहराबाहेर थांबविली असती तर ही कोंडी टळू शकली असती.

विद्यार्थ्यांची गैरसोय
वाहनांची गर्दी इतकी होती की मुलांना घेण्यासाठी जाणारे ऑटो तसेत शाळेतून मुलांना घेऊन निघालेल्या बसेस मध्येच अडकल्या, त्यामुळे पालकांची घालमेल झाली. रामदासपेठमधील सोमलवार शाळेच्या मागचा रस्ता मुळातच अरुंद आहे. बर्डीवरील वाहतूक कोडींमुळे अनेकांनी त्यांची चारचाकी वाहने पर्यायी रस्ते म्हणून रामदासपेठेतून वळविली त्यामुळे शाळेचा मागचा भाग वाहनांची कोडी झाली. त्यामुळे मुलांना घेण्यासाठी आलेले ऑटो तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हते व ज्या ऑटोमध्ये मुले बसली होती ते वाहनांच्या गर्दीत अडकली होती. तशीच अवस्था वर्धामार्गावर असलेल्या शाळांची झाली. या शाळेत असणाऱ्या मुलांना शहरातील विविध भागात सोडून देणाऱ्या बसेस बर्डीवर अडकल्या. काही रामदासपेठेत तर काही इतरत्र अडकल्या. त्यामुळे पालकांची चिंता वाढली होती.
रुग्णवाहिका अडल्या
रामदासपेठ, धंतोलीमध्ये असलेल्या असंख्य खासगी इस्पितळांमुळे हा भाग नागपूरचे मेडिकल हब म्हणून ओळखला जातो. येथे बाहेरगावचे हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. अत्यवस्था रुग्णांना मेडिकल किंवा मेयोमध्ये तातडीने हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय असते. मात्र, आज या भागातील एकाही इस्पितळातून रुग्णवाहिका बाहेर निघू शकत नव्हती. घाटरोडवरून आलेल्या रुग्णवाहिका धंतोली पोलीस ठाण्यापुढे झालेल्या कोंडीत सापडल्या होत्या. जनता चौक ते कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच जनता चौकापासून आतमध्ये जाणारे सर्व उपरस्तेही वाहनांच्या गदीने तुडुंब भरले होते.

एकाच दिवशी हजारो वाहने शहरात
शहरात काँग्रेस आणि धनगर समाज संघर्ष समिती यांचे एकाच दिवशी मोर्चे होते. या दोन्ही मोर्चासाठी संपूर्ण राज्यातून वाहनाने लोक आले. वाहनांची ही संख्या हजारोंच्या घरात होती. त्यांना पार्किंगसाठी जागा नसल्याने त्यांनी दीक्षाभूमी ते बर्डी तसेच राहाटे कॉलनी ते जनता चौक, धंतोली पोलीस ठाणे या भागात भर रस्तावर उभी केली. त्यात मोठय़ा खासगी बसेसचाही समावेश होता. त्यामुळे इतर वाहने जाण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळेही कोंडी अधिक वाढली.

काँग्रेस, धनगर आरक्षण संघर्ष समिती आणि अंगणवाडी सेविका असे तीन मोठे मोर्चे होते. त्यासाठी बर्डी आणि रेल्वे स्थानकापुढील उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे बर्डी व काही भागात वाहतुकीची कोंडी झाली, सायंकाळनंतर ती पूर्ववत झाली.
– भरत तांगडे,
पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा)