’ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
’ आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधप्रबंध प्रसिद्ध
नागपूरसह देशाच्या अनेक भागात बाराही महिने चांगले उन्ह असते. या सूर्यप्रकाशातून वीजनिर्मितीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहायक प्राध्यापक प्रमोद गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन सौर मॉडल तयार केले. त्याच्या मदतीने सूर्यप्रकाश असताना एकाच वेळी थेट वीज वापरासह रात्रीला वीज संचय करणे शक्य झाले आहे. या प्रकल्पाचा घरोघरी वापर झाल्यास सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मितीचे कारखाने उभे राहणे शक्य आहे. हा शोध प्रबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला, हे विशेष.
भारतात सध्या सर्वाधिक वीजनिर्मिती कोळसा, गॅस, युरेनियम, अणुऊर्जासह इतर विविध स्रोतांच्या मदतीने केली जाते. त्याचे साठे जगात मर्यादित असल्याने ते संपल्यावर अपारंपरिक ऊर्जानिर्मिती हाच एकमात्र पर्याय आपल्यापुढे शिल्लक राहणार आहे. त्याकरिता नागपूरसह देशाच्या अनेक भागात बाराही महिने पडणारा सूर्यप्रकाश हा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. सध्या सूर्यप्रकाशातून महाराष्ट्रासह देशातील काही भागात थोडय़ा प्रमाणात ऊर्जानिर्मिती होत असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. तेव्हा या वाया जाणाऱ्या सूर्यप्रकाशापासून ऊर्जानिर्मितीच्या एका प्रकल्पावर नागपूरच्या अंजुमन अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी काम केले.
त्याअंतर्गत सूर्यप्रकाश असताना सौर पॅनलमधून ऊर्जा निर्माण करून त्याचा थेट वापर करण्यासह ही ऊर्जा बॅटरीमध्ये संग्रहित करण्याच्या प्रक्रियेवरही भर दिला गेला. या प्रकल्पाला यश मिळाले असून त्याने बाराही महिने सूर्यप्रकाश पडणाऱ्या भागातील घरोघरी वीजनिर्मितीचे कारखाने सुरू होणे शक्य झाले आहे. या प्रकल्पांतर्गत माइक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यात सूर्यप्रकाश असताना सौर पॅनलच्या साहाय्याने ऊर्जानिर्मिती होईल. ही ऊर्जानिर्मिती सौर पॅनलसह या प्रकल्पासाठी वापरली जाणाऱ्या बॅटरीच्या क्षमतेनुसार होईल. ही ऊर्जा विशिष्ट डिव्हाईसच्या मदतीने थेट वापरणे शक्य असेल. सोबत शिल्लक राहणाऱ्या विजेच्या लोडनुसार बॅटरीमध्ये ऊर्जा संचयाचे कामही हे डिव्हाईस करेल.
सौर पॅनलवर सूर्यप्रकाश नाहीसा होताच स्वयंचलित पद्धतीने वीज बॅटरीवरून संबंधिताला मिळणे सुरू होईल. बॅटरीतील संचयित वीज संपताच स्वयंचलित पद्धतीने ग्राहकाला महावितरण वा विविध वीज कंपनीच्या जोडणीतून वीज मिळेल.
हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी फार कमी क्षमतेचा केला असला तरी त्यात आणखी संशोधन करून त्याची क्षमता वाढवणे शक्य असल्याचा दावा अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. हा शोध प्रबंध ४ एप्रिल २०१६ ला इंटरनॅशनल जनरल ऑफ इनोव्हेटिव्ह सायन्स, इंजिनियरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये प्रसिद्धही झाला आहे. या संशोधनासाठी प्राचार्य साजीत अन्वर, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. अर्चना शिरभाते व सहायक प्राध्यापक प्रमोद गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आदील शेख, धीरज पाचीपेंटा, शहजाद राजवानी, अजन देवालकर, सुनील कनोजे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सोलर ट्रॅकिंग सिस्टम फायद्याची
सौर ऊर्जा प्रकल्पात सोलर ट्रॅकिंग सिस्टम फायद्याची असून ती लावल्यास खर्च वाढतो, परंतु या स्वयंचलित पद्धतीने सूर्यप्रकाशाच्या दिशेने पॅनल वळून जास्तीत जास्त वीज निर्माण होते. अंजुमनच्या प्रकल्पात आणखी मोठय़ा प्रमाणात सुधारणा शक्य असून त्यातून मोठय़ा प्रमाणात देशात वीजनिर्मिती होऊ शकते, असे मत अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल विभागाचे सहायक प्राध्यापक प्रमोद गाडगे यांनी व्यक्त केले.
-प्रमोद गाडगे

दहा वर्षांत गुंतवणुकीहून जास्त बचत
अंजुनमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शोध निबंधात १००० व्हॅट लोडच्या सौर प्रकल्पातून ६ तास वीज वापरल्यास महिन्याला १८० युनिट विजेची बचत शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून दहा वर्षांत सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची बचत होईल, तर ३००० व्हॅट लोडच्या सौर प्रकल्पातून ६ तास वीज वापरल्यास महिन्याला ५४० युनिट विजेची बचत होईल. त्यातून दहा वर्षांत सुमारे ४ लाख ८ हजार रुपये वाचतील. त्यामुळे गुंतवणुकीहून जास्त बचत असल्याचे शोध प्रबंधात सांगण्यात आले आहे.