महेश बोकडे

विदर्भात करोना उद्रेकामुळे एकीकडे शासकीय व खासगी रुग्णालयांत खाटा शिल्लक नाहीत. दुसरीकडे  चाचणीसाठी नमुने दिल्यास त्याचा अहवाल यायला दोन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.  परिणामी, उपचाराच्या विलंबामुळे या अत्यवस्थ रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडत आहे. त्यातच येथे रेमडेसिविर, फेविपिरावीरसह इतर औषधांचाही तुटवडा असल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला  आहे.

याबाबत वाडी परिसरातील वर्मा कुटुंबाने त्यांचा अनुभव सांगितला.  घरच्या  कर्ता पुरुषाला तापासह हलका खोकला सुरू झाला. त्याने जवळच्या तेलंखेडी केंद्रावर करोना चाचणीसाठी नमुने दिले. सोबत एका जवळच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू केला. परंतु करोना सकारात्मक अहवाल यायला चार दिवस लागले. या दरम्यान रुग्णाला श्वास घेण्यासह इतर त्रास सुरू झाले. प्राणवायूचा स्तर ७० हून कमी झाल्यावर नातेवाईकांकडून  रुग्णाला खाट मिळवण्यासाठी पायपीट सुरू झाली. जागा न मिळाल्याने जवळच्या एका रुग्णालयात डे केअरमध्ये उपचार सुरू झाले. परंतु पूर्णवेळ खाट न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली. कामठीहून एक सिलेंडर मिळवून घरात प्राणवायू पुरवला. एकाने हिंगणा रोडवरील रुग्णालयात खाट मिळवून दिली. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

यादरम्यान त्यांना करोना असल्याचे निदान झाल्यावर त्यांच्या पत्नीनेही तेथील केंद्रात नमुने दिले. परंतु त्यांनाही तीन दिवसांनी करोनाग्रस्त असल्याचा अहवाल मिळाला. नागपूरच्या काही खासगी प्रयोगशाळेतही अहवालाला दोन दिवसाहून जास्त कालावधी लागत आहेत.  काही केंद्रात २४ तासांतही अहवाल येत आहेत. त्यामुळे नागपूरच्या करोना अहवालाच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बुलढाण्यातही अहवालाला चार दिवस, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह््यात सुमारे दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. अमरावतीला ३, अकोला २, वाशीमलाही दीड ते दोन दिवस अहवालासाठी लागत आहे. वर्धा जिल्ह््यातही अहवालासाठी तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्ण विलंबाने येत असल्याने  मृत्यू वाढल्याचा दावा  प्रशासनाकडून होतो. परंतु अहवालाच विलंब होत असल्याने रुग्णावर विलंबाने उपचार सुरू होत असल्याने येथे गंभीर रुग्ण वाढत असल्याचा सूर वैद्यकीय क्षेत्रात उमटत आहे. दरम्यान, नागपूर व यवतमाळच्या जिल्हा शल्यचिकित्सकाकडून २४ तासांत अहवाल मिळत असल्याचा दावा केला गेला. काही जिल्ह््यातील शल्यचिकित्सकांनी विलंब होत असला तरी दीड दिवसाहून जास्त कालावधी लागत नसल्याचा दावा केला.