अनेक तरुणांनी तस्करीचा मार्ग पत्करला

मंगेश राऊत, नागपूर</strong>

गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीच्या प्रमाणात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून शहरातील तरुणाई या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत असल्याचे आजवरच्या कारवाईवरून स्पष्ट होते. अंमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीमध्ये अटक करण्यात आलेले बहुतांश हे तरुण असल्याचे समोर आले असून ‘एमडी’ (मेफीड्रोन) या घातक अंमली पदार्थाच्या तस्करीचा मार्ग अनेक तरुणांनी पत्करला आहे.

एकेकाळी उपराजधानीत केवळ गांजा आणि चरस अशाच अंमली पदार्थाचे सेवन व्हायचे. पण, आता कोकेन, एमडी, ब्राऊन शुगर अशा महागडय़ा व रासायनिक प्रक्रिया केलेले जीवघेणे अंमली पदार्थ सर्रासपणे शहरात दाखल होत आहेत. १ जानेवारी ते २४ जून २०१९ या कालावधीमध्ये गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एकूण ६१ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ४३ गुन्हे गांजाचे, १ गुन्हा चरसचा असून १२ गुन्हे एमडी (मेफीड्रोन) या अंमली पदार्थाचे सेवन व तस्करीचे आहेत. या कारवयांमध्ये गांजानंतर सर्वाधिक २४ लाख ४३ हजार १०० रुपये किंमतीचे एमडी पोलिसांनी जप्त केले.

जुलै २०१७ ते जून २०१९ या कालावधीमध्ये एनडीपीएसच्या पथकाने ४०७ तस्करांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून ४ कोटी ५७ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  पाच वर्षांपूर्वी शहरात एमडी क्वचितच मिळत होते. पण, आता अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांपैकी प्रत्येक दुसरा व्यक्ती एमडीचे सेवन करीत असून गुन्ह्य़ांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा जीवघेण्या अंमली पदार्थाच्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांना अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.

एमडीच्या तस्करीत यांचे वर्चस्व

गेल्या काही वर्षांमध्ये ताजबाग परिसरातील आबू, मोहित शाहू, अंगी बग्गा (पारडी), वर्धमाननगरमधील कारडा, सतरंजीपुरा येथील छोटा नव्वा, गंगा जमुना परिसरात नितीन कारगिवार, अंकित राणा, खामला परिसरात आसमी जेठानी, नितीन मखिजानी, ताजबागमध्ये अकरम खान, सुलतान खान, कालू ऊ र्फ अबरार, सीताबर्डीमध्ये गब्बर, यादव, मिठा नीम दर्गाजवळ असलम (शकीलचा भाऊ), सदरमध्ये शकील गोवा कॉलनी आणि वंजारी, मानकापूरमध्ये शुक्ला, कोतवाली प्यारुगुड्डी, गणेशपेठमध्ये लंगडा, राजू वर्मा (भगवाघर चौक) आणि अनवर यांची नावे एमडी तस्करीसाठी घेतली जातात. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध एनडीपीएस पथकाने कारवाई अतिशय गतिमान केली. कारवाईची संख्याही मोठी आहे. मुंबईतून अनेक आरोपींना अटक करण्यात आली. तस्करांना जेरबंद करण्यासोबत शाळा व महाविद्यालयीन तरुणाईमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. प्राप्त माहितीनुसार सर्व तस्करांवर कारवाई करण्यात येईल.

– राजेंद्र निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एनडीपीएस