व्यवस्थापन प्रतिनिधींमध्ये सेक्युलरचे यश; विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेटमधील प्राचार्य गटात तायवाडे गटाने बाजी मारली. प्रत्येक गटात यंग टिचर्स असोसिएशनने घवघवीत यश प्राप्त केले आहे, तर व्यक्तिगत किंवा विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांना दुखावल्याचे प्रकरण सेक्युलर पॅनलच्या अंगलट आल्याचे दिसते. या पॅनलच्या एकूण कामकाजावर मतदार खुश नसल्याचे निवडणुकीतून सिद्ध होते.

प्राचार्य गटात नऊपैकी सात प्राचार्य निवडून येतील, असा बबन तायवाडे यांचा दावा होता. मात्र, पाच प्राचार्य निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यात विमेन्स कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्सचे नरेंद्र दीक्षित पहिल्याच फेरीत निवडून आले. नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेजचे संजय धनवटे, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्रल्हाद पवार, मौद्याच्या एसआरबीटी महाविद्यालयाचे विनोद गावंडे आणि कोराडी तायवाडे महाविद्यालयाच्या शरयू तायवाडे यांचा समावेश आहे. सेक्युलर पॅनलकडून दुसऱ्या फेरीत मृत्युंजय सिंग, विवेक नानोटी आणि डॉ. मसराम निवडून आले आहेत, तर शिक्षण मंचाकडून उर्मिला डबीर यांनी खाते उघडले.

सिनेटवर प्राचार्याच्या दहा जागा आहेत. त्यापैकी पाच खुल्या प्रवर्गासाठी तर पाच आरक्षित होत्या. त्यात व्हीजेएनटी गटात चंदनसिंग रौटेले आधीच बिनविरोध निवडून आल्याने नऊ प्राचार्यासाठी मतदान झाले. त्यात यंग टिचर्स असोसिएशनने बाजी मारली. रौटेले यांच्यावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. सिनेटमधून दोन प्राचार्याना व्यवस्थापन परिषदेवर निवडून देताना रौटेले नेमके कोणाचे? हे कळेलच.

सिनेटमधील दुसरा मतदारसंघ विद्यापीठ परिसरातील विभागांमधील तीन प्राध्यापकांना सिनेटवर निवडून द्यायचे आहे. त्यात एक जागा नागपूर विद्यापीठ टिचर्स ऑर्गनायझेशन (नुटो) आणि सेक्युलर पॅनलचे उमेदवार ओ.पी. चिमणकर यांना गेली आहे तर यंग टिचर्स असोसिएशननेच पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील सुरेश झाडे आणि ममता लांजेवार निवडून आले आहेत.

सिनेटमधील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधींमध्ये सेक्युलर पॅनलने बाजी मारली आहे. या पॅनलच्या स्मिता अभिजित वंजारी, दुष्यंत सतीश चतुर्वेदी आणि किशोर उमाठे निवडून आले, तर यंग टिचर्स असोसिएशनकडून बबन तायवाडे आणि शिक्षण मंचकडून राजेश भोयर विजयी झाले आहेत. डॉ. आंबेडकर एमबीए अभ्यासक्रम संस्थेचे संचालक सुधीर सदानंद फुलझेले अनुसूचित जातीतून बिनविरोध निवडून आले आहेत.