13 November 2019

News Flash

‘र्मचट नेव्ही’त नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक

इराणमध्ये जहाजात डांबण्याचा प्रकार

(संग्रहित छायाचित्र)

इराणमध्ये जहाजात डांबण्याचा प्रकार

मंगेश राऊत, नागपूर

‘र्मचट नेव्ही’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या अनेक कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. अशाच एका कंपनीने उपराजधानी नागपुरातील सहा तरुणांना लाखो रुपयांना गंडवले आहे. तसेच इराणमध्ये पाठवून त्यांना एका जहाजामध्ये डांबून ठेवण्याचा प्रयत्न झाला.  याप्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

र्मचट नेव्हीमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी असल्याने मोठय़ा प्रमाणात तरुण या क्षेत्राकडे आकर्षित होतात. त्यामुळे मागील  काही वर्षांमध्ये देशातील विविध भागात र्मचट नेव्हीचे अभ्यासक्रम व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. यात काही दलालही सक्रिय झाले असून ते तरुणांची फसवणूक करीत आहेत. असाच अनुभव नागपूरच्या तरुणाला आला. काटोल मार्गावरील हेमंत लोटन मराठे याने चंदीगड येथील टी.एम.सी. शिपिंग इन्स्टिटय़ूटमधून र्मचट नेव्हीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नोकरीसाठी विविध कंपन्यांचा शोध घेत असताना त्याचा मुंबईतील श्रीराम जखातिया (रा. एफ २०३, नॉलेज बिझनेस पार्क, अंधेरी कुर्ला रोड) या दलालाशी  संपर्क झाला. त्याने एका   कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी ३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च येईल, असे सांगितले. हेमंतने पैसे दिल्यावर  १५ नोव्हेंबर २०१८ ला त्याला इराणमधील तेहरान येथे पाठवण्यात आले. त्या ठिकाणी सफा ओमागी हा दलाल त्यांना भेटणार होता. तेथे  ओमागीने पुन्हा पैशाची मागणी केली. पैसे न दिल्याने जवळपास ३६ तास हेमंत तेहरान विमानतळावर थांबून होता. शेवटी ओमागीने त्यांला गनेवा पोर्टवर नेले. तेथे एका जहाजात त्याची रवानगी करण्यात आली. या ठिकाणी हेमंतच्या येण्यापूर्वीपासून पाच भारतीय तरुण होते. त्यांनाही रोजगाराच्या नावाने आणण्यात आले होते. जहाज दुबईकडे निघाल्यावर  जहाजावरील कर्मचारी या मुलांचा पैशाकरिता छळ करीत होते. येथे त्यांना डांबून ठेवण्यात आले. या सर्व प्रकारानंतर सर्वाना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

अशी झाली सुटका

जहाज दुबईला पोहोचल्यानंतर हेमंतने तेथून बहिणीशी संपर्क साधला. तिला सर्व माहिती दिली. बहिणीने मुंबईतील जहाजराणी  विभागाच्या संचालकांना मेल करून या मुलांची सुटका करण्याची विनंती केली. त्यानंतर संबधित विभागाने दुबईत संपर्क साधून सर्वाची सुटका केली. त्यांना दुबई पोलीस ठाण्यात नेण्यात आले व सात-आठ दिवसांनी त्यांना परत भारतात पाठवण्यात आले.

इमिग्रेशन बनावट, जहाज काळ्या यादीत

हे सर्व तरुण भारतात परतल्यानंतर त्यांनी जहाजराणी विभागाकडून माहिती घेतली असता तरुणांसाठी तयार करण्यात आलेले इमिग्रेशन बनावट असल्याचे आढळून आले. तसेच इराणमधील संबंधित जहाज हे काळ्या यादीत असून त्या जहाजाला कोणत्याच देशात प्रवेश नाही, अशी माहिती मिळाली.  या संदर्भात हेमंतने गिट्टीखदान आणि मुंबई पोलिसांत तक्रार केली असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पैसेही परत दिले, जहाज सुरू

तरुणांना पाठवताना त्यांना सर्व अटी व शर्तीची माहिती देण्यात येते. या प्रकरणांमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. पण, तरुण भारतात परतले असून त्यांना त्यांचे काही पैसे परत करण्यात आले आहेत. उर्वरित पैसे परत करण्यात येतील. हेमंतचे केवळ एक लाख ३० हजार रुपये शिल्लक आहेत. इराणमधील ते जहाज काळ्या यादीत नसून सध्या ते वाहतूक करीत आहे.

– श्रीराम जखातिया, दलाल, मुंबई.

पैसेही परत दिले, जहाज सुरू

तरुणांना पाठवताना त्यांना सर्व अटी व शर्तीची माहिती देण्यात येते. या प्रकरणांमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. पण, तरुण भारतात परतले असून त्यांना त्यांचे काही पैसे परत करण्यात आले आहेत. उर्वरित पैसे परत करण्यात येतील. हेमंतचे केवळ एक लाख ३० हजार रुपये शिल्लक आहेत. इराणमधील ते जहाज काळ्या यादीत नसून सध्या ते वाहतूक करीत आहे.

– श्रीराम जखातिया, दलाल, मुंबई.

First Published on February 19, 2019 2:14 am

Web Title: youth cheated in the name of merchant navy job