उपराजधानीतील एक दहा महिन्यांच्या मुलाला ‘बिलीअरी अट्रेसिया’ आजाराने ग्रासले. हळूहळू त्याचे यकृत निकामी होत होते. कुटुंबीयांनी देशातील नावाजलेल्या रुग्णालयांना भेटी दिल्या. परंतु, वय कमी आणि खर्च आवाक्याबाहेर. शेवटी उपराजधानीतील न्यू ईरा रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी लागणारा खर्च विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी लोकवर्गणीतून उचलला.
मोहम्मद अब्बास असे रुग्णाचे नाव असून त्याच्या शरीरात जन्मतच पित्ताशय आणि पित्त घेऊन जाणारी वाहिनी परिपूर्ण नव्हती. त्यामुळे त्याचे यकृत निकामी होत होते. त्याचे वजनही केवळ ६ किलो होते. मुलाच्या कुटुंबाने दिल्ली, मुंबईतील मोठ्या रुग्णालयांत डॉक्टरांचा सल्ला घेतला. परंतु वय कमी असल्याने बऱ्याच डॉक्टरांनी नकार दिल.
दरम्यान, कुटुंबीयांनी न्यू ईरा रुग्णालयातील संचालक व ह्रदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश अग्रवाल, ह्रदय रोग तज्ज्ञ डॉ. निधेश मिश्रा यांची भेट घेतली.येथी डॉक्टरांच्या चमूने यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. मुलाच्या मावशीने यकृत देण्याची तयारी दर्शवली. २१ जूनला प्रत्यारोपण झाले. आता मुलाची प्रकृती उत्तम आहे. दोन आठवड्यापूर्वी त्याला रुग्णालयातून सुट्टीही झाली. १६ तास चाललेल्या शस्त्रक्रियेत डॉ. साहिल बंसल, डॉ. आयुष्मा जेज़ानी, डॉ. निशू बंसल, डॉ. स्वप्निल भीसीकर, डॉ. आनंद भुतड़ा यांनी महत्वाची भूमिका वठवल्याचे डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले.
मुलांमध्ये यकृत प्रत्यारोपण गुंतागुंतीचे असते. यशस्वी प्रत्यारोपण झाल्याचा आनंद आहे.
– डॉ. राहुल सक्सेना, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ
न्यू ईरा रुग्णालयात ५१ यकृत प्रत्यारोपण झाले. शेवटचे प्रत्यारोपण केवळ १० महिन्यांच्या मुलामध्ये झाल्याने नागपुरात आता सगळ्याच वयोगटातील व्यक्तींत प्रत्यारोपणाची क्षमता असल्याचे स्पष्ट झाले.
– डॉ. आनंद संचेती, संचालक, न्यू ईरा रुग्णालय