Rashtriya Swayamsevak Sangh Rajiv Gandhi नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – न्यू होरायझन्स’ या तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विविध विषयांवर मते व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ भाजपलाच मदत करतोय असा प्रश्न सरसंघचालकांना विचारण्यात आला यावर भागवत यांनी राजीव गांधी एनएसयूआयचे अध्यक्ष असतानाचा किस्सा सांगितला काय होता तो प्रकार बघा…

सरसंचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना नागपूरमध्ये त्यांचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाला देशभरातून तीस हजारावर नागरिक उपस्थित झाले होते. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भांडण झाले होते. एकमेकांसोबत हाणामारी करण्यापर्यंत गोष्ट गेली होती. या स्वयंसेवकांसाठी जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तिथेही मोठे भांडण झाले. एकमेकांच्या अंगावर जेवणाच्या थाळ्या फेकण्यापर्यंत प्रकरण केले होते. त्यामुळे अधिवेशनाची संपूर्ण व्यवस्था बिघडली होती.

व्यवस्था बिघडल्याने कार्यक्रमाचे आयोजक अस्वस्थ झाले होते. यावेळी काँग्रेसकडे काहीच उपाय नसल्याने शेवटी तत्कालीन काँग्रेसचे खासदार यांनी मला फोन केला. त्यावेळी मी संघाचा प्रचारक होतो. काँग्रेसचे अधिवेशनातील खानावळ सुरू करण्यासाठी स्वयंसेवकांची मदत मागितली. त्यांच्या अकरा खानावळी होत्या. ११ खानावळीपैकी आठ ठिकाणी आम्ही स्वयंसेवक पाठवले आणि खानावळ सुरू करून दिली. त्यामुळे मदत करताना संघ कधीही पक्ष, जात,  धर्मपंथ असा कुठलाही भेद करत नाही. जिथे जिथे आम्हाला मदत मागितली तिथे संघाचे स्वयंसेवक कायम उभे राहतात असे सरसंचालक मोहन भागवत यांनी सांगितले.

मोहन भागवत हिंदू सणांबद्दल काय म्हणाले?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू सणांदरम्यान लोकांच्या भावनांचा आदर करण्यासाठी मांसविक्री मर्यादित ठेवण्यास समर्थन दिले, त्याच वेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, लोकांच्या खाण्याच्या सवयी हा कोणाचाही वैयक्तिक प्रश्न असू नये. भागवत म्हणाले, “अन्नपदार्थांचा धर्माशी संबंध नाही; पण उपवासाच्या दिवशी लोक त्याचे सेवन टाळतात. सणांदरम्यान शाकाहारी जेवण घेणे सामान्य आहे. अशा वेळी जर कोणी आपल्या घरासमोरच असे (मांस खाताना किंवा विकताना) दिसले, तर त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. तो सण फक्त दोन-तीन दिवसांचा असतो. अशा वेळी सारासार विचार करून लोकांनी अशा गोष्टींपासून दूर राहायला हवे. कोणी काय खातो याने माझ्या भावना दुखावू नयेत; पण त्यांच्या भावनांचा आदर करणे चांगली गोष्ट आहे. भागवत यांनी संघाच्या ऐतिहासिक भूमिकेवर जोर दिला की, शाकाहाराला प्रोत्साहन देण्याच्या अजेंड्याशिवाय लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे.