नागपूर: ‘आयुष’च्या आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयात ३०० पैकी किमान १५० गुण आवश्यक असल्याची अट आता ‘आयुष’ मंत्रालयाने काढून टाकली आहे. त्यामुळे या तीन विषयात केवळ उत्तीर्ण असल्यास वरील अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला गुणवत्तेची पातळी काढून टाकल्याने या निर्णयाचा शिक्षण तज्ज्ञांकडून विरोध होत आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये अनेकदा विविध बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला बारावी गुणांच्या आधावर विविध वैद्यकीय शाखांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश होत होते. त्यानंतर ‘पीएमटी’ परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर आरक्षणाच्या नियमात बदल झाल्यानंतर देशपातळीवर ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा सुरू करण्यात आली. आता वैद्यकीय आणि आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद, होमिओपॅथी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही ‘नीट’ परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाच्या नवीन परिपत्रकानंतर आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, बारावी परीक्षेतील गुणांची अट मात्र काढून टाकण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्यपूर्ण व उपयुक्त मनुष्यबळ निर्माण करणे हे उदिष्ट असताना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पात्रता शिथिल करायची बाब ही निश्चितच प्रश्न निर्माण करणारी आहे. यामुळे दर्जेदर डॉक्टर कसे निर्माण होणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

केवळ १५ गुणांची गरज

बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांना प्रत्येकी १०० गुण असतात. त्यापैकी ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांचे प्रात्यक्षिक परीक्षा असते. प्रत्येक विषयांत उत्तीर्ण होण्यासाठी फक्त ३५ गुणांची आवश्यकता असते. बहुतांशी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत २० पैकी २० गुण दिले जातात. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला ८० गुणांच्या लेखी परीक्षेत फक्त वीस गुण मिळाले म्हणजे लेखी परीक्षेत फक्त २५ टक्के गुण मिळाल्यांना पण आता ‘आयुष’ डॉक्टर होण्याची संधी प्राप्त होणार आहे. यामुळे ‘आयुष’ डॉक्टरांचा दर्जा कसा राहणार?

सरकारला संख्यात्मक वाढ हवी की गुणात्मक?

महाराष्ट्रात शासकीय/अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांत अंदाजे ८३८, होमिओपॅथी महाविद्यालयांत ६३ व युनानी महाविद्यालयांत १८० जागा आहेत. विनाअनुदानित ‘आयुष’ महाविद्यालयांच्या संख्येत दरवर्षी भर पडताना दिसते. राज्यातील विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांत अंदाजे ५५११, होमिओपॅथी महाविद्यालयांत ४७०५ व युनानी महाविद्यालयांत २३० जागा आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयातील सर्व जागा भरण्यासाठी ही सामाईक प्रवेश परीक्षेसाठीची पात्रता शिथिल करण्यात आली का, अशी शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला फक्त संख्यात्मक वाढ पाहिजे की गुणात्मक, याचा विचार होणे आवश्यक. यामुळे आयुष अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान ५० टक्के गुणांची अट काढून टाकणे, यावर पूनर्विचार होणे गरजेचे वाटते, अशी मागणी शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी केली.

आयुष अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन विषयात किमान ५० टक्के अट काढून टाकणे, याला काही तर्कसंगत व योग्य कारण दिसत नाही. सरळसरळ या अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थांचा दर्जा न बघता त्यांना फक्त बारावीत उत्तीर्ण असणे एवढेच बघणे निश्चितच अयोग्य वाटते.-डॉ. मोहन येंडे,माजी राज्य महासचिव, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा).