अमरवती : चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेच्या आवारातील पाण्याची टाकी मंगळवारी सायंकाळी कोसळल्याने बामदेही येथील १४ वर्षीय सुमरती सोमा जामुनकर हिचा मृत्यू झाला तर ३ मुली गंभीर जखमी झाल्या. सुमरतीचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तब्बल १२ तास उलटूनही शाळेतील एकही कर्मचारी रुग्णालयात न पोहचल्याने रोष व्यक्त करण्यात आला.

नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेत मंगळवार सायंकाळी सहाच्या सुमारास या मुली भांडे धुण्याकरता गेल्या होत्या त्यात अचानक पाण्याची टाकी कोसळली यामध्ये ढिगाऱ्याखाली दबून एका मुलीचा जागेवरच मृत्यू झाला, तर तीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ परतवाडा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. राधिका जामुनकर,अनिशा सेलूकर, रानी धांडे अशी जखमी मुलींची नावे आहेत.

घटनेनंतर सुमरतीचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेविषयी शाळेकडून १२ तासा उलटून गेल्यावरही अधिकृत माहिती देण्यात आली नाही असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी नकार दिल्याने रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर माजी आमदार राजकुमार पटेल, प्रभारी आदिवासी प्रकल्प अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी शवविच्छेदन धारणीला न करता अचलपुरातच इन कॅमेरा करण्याविषयी वडिलांची संमती घेतल्याने दुपारी २ च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आल्याने तणाव निवळला. रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी आमदार राजकुमार पटेल यांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि शाळा संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्याध्यापक निलंबिंत

शाळेतील पाण्याच्या टाकीची जीर्ण भिंत कोसळल्यामुळे सुमरतीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, निलेश कथे व अधीक्षीका शैलेजा सालोडकर यांना निलंबीत करण्यात आले असून तहसीलदार, टीएचओ यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. चौकशी अंती पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी मोहन व्यवहारे यांनी दिली.