नागपूर : केंद्र शासनाच्या अमृत-दोन योजनेतून नागपुरातील नाईक तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून याप्रकल्पावर १२.९५ कोटी खर्च करण्यात येणार आहे. या निधीलाही मंजुरी मिळाली आहे.
२०२१-२२ या वर्षापासून राज्यात अमृत-२ या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. यातून तलाव पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास व पायाभूत सुविधांचा विकास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केला जात आहे. याशिवाय अमृत-१ मध्ये शिल्लक राज्यातील ४४ शहरांमधील मलनिस्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात नागपूर शहरातील नाईक तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा ही समावेश आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक आराखड्यास राज्य जीवन प्राधिकरणाने यापूर्वीच मान्यता दिली होती.
हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली
राज्य तांत्रिक समितीच्या मान्यतेची गरज होती. १० ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पावर १२.९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यापैकी प्रत्येकी २५ टक्के आर्थिक भार केंद्र व राज्य शासन उचलणार असून ५० टक्के रक्कम नागपूर महापालिकेला खर्च करायची आहे. शहरातील प्रमुख व ऐतिहासिक जलाशयांपैकी नाईक तलाव एक आहे. त्यातील पाण्याचा पूर्वी पिण्यासाठी वापर होत होता. कालांतराने सभोवताली अतिक्रमण झाले तसेच परिसरातील वस्त्यांमधून तलावात घाण पाणी तलावात सोडण्यात येत असल्याने त्यातील पाणीही प्रदूषित झाले.