यवतमाळ: स्थानिक गुन्हे शाखेने ट्रॅव्हल्समधून चांदी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत मध्यप्रदेशातील एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून १६ किलो १६८ ग्रॅम चांदीचे अंदाजे सात लाख ६८ हजार ७८८ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. तेलंगणातील सराफा व्यापारी प्रतीक प्रदीप कोटक हे २२ मे रोजी यवतमाळहून विजय ट्रॅव्हल्स (क्र. एनएल ०९, व्हि २९०९) बसने किसरा दमइगुडा, तेलंगणा येथे प्रवास करत होते. त्यांनी यवतमाळमधील त्यांचे मामा जिग्नेश हिंडोच्या यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचे १६ किलो ८२७ ग्रॅम चांदीचे दागिने खरेदी केले होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास बस पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील हिंदुस्थानी धाब्यावर जेवणासाठी थांबली. त्यावेळी कोटक हे चांदीची बॅग सीटवर ठेवून स्वच्छतागृहात गेले. परत आल्यावर त्यांना बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाची जबाबदारी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन संशयित व्यक्ती बनावट नंबर प्लेट लावलेल्या वाहनातून पळून जात असल्याचे निष्पन्न केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनावर तालुक्यातील पटेलपुरा लेन्हुरा या गावातून मोल खान रोशन खान (२८) याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदार मुस्ताक उर्फ चिलू शमशेर खान आणि शाहरुख खान रमजान खान (दोघेही रा. खेरवा, जि. धार) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या मोल खान याला पांढरकवडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुषीर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपासात अजयकुमार वाढवे, धनराज हाके, तसेच पथकाने केली. यवतमाळ गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला असून, मोठ्या चोरीचा उलगडा करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने ट्रॅव्हल्समधून करताना चोरटे लक्ष ठेवून असतात हे स्पष्ट झाले असून, ट्रॅव्हल्सचे थांबे असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.