वर्धा:  दीक्षांत सोहळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण. मान्यवरांच्या हस्ते पदवी, पदक स्वीकारतांना गुणवंतांना लाभणारा आनंद पहावा असाच. सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा १६ वा दीक्षांत सोहळा ६ मे मंगळवारला विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता होणार. याप्रसंगी अदानी फॉउंडेशनच्या  डॉ. प्रीती अदानी तसेच भारताच्या सर्जन व्हॉइस अँडमिरल डॉ. आरती सरीन यांची मुख्य उपस्थिती राहणार.

डॉ. आरती सरीन यांचे स्थान !

दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉ. आरती सरीन भारताच्या सर्जन अँडमिरल तथा सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. त्यांना संरक्षण राज्यमंत्रीस्तर समकक्ष दर्जा आहे. सशस्त्र दलाच्या इतिहासातील त्या सर्वोच्च दर्जाच्या महिला अधिकारी असून भारतीय नौदलात व्हॉइस अँडमिरल हे पद प्राप्त करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या. दलाच्या तिन्ही शाखामध्ये सेवा देण्याचा त्यांना दुर्मिळ सन्मान प्राप्त झाला आहे. २०२४ मध्ये डॉ. सरीन यांना अती विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले. तसेच विविध सैन्य गौरव त्यांच्या नावे आहेत. पुण्यातील आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून पदवी व रेडिओलोजी यात एमडी प्राप्त केली. युएसए येथील पिटसबर्ग विद्यापीठातून त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

दीक्षांत सोहळ्यात डॉ. प्रीती अदानी, मेघे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजीव बोरले व नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित केल्या जाणार आहे. याप्रसंगी कुलपती दत्ता मेघे, प्र – कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, प्र – कुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, प्रधान सल्लागार सागर मेघे, व्यवस्थापन मंडळाचे डॉ. मंदार साने, आरती कुलकर्णी, अनिल पारेख, डॉ. अनुप मरार, समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. तृप्ती वाघमारे, डॉ. झहीर काझी, कुलसचिव डॉ. श्वेता पिसुळकर, रवी मेघे, डॉ. सुनीता वाघ, डॉ. अल्का रावेकर व अन्य उपस्थित असतील. समारोहात १ हजार ७२४ विद्यार्थ्यांना दिक्षा दिली जाणार आहे. तसेच ७३ पीएचडी पदवीप्राप्त व ३८ फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव होणार. ८१ विद्यार्थ्यांना १२० सुवर्ण, ६ रौप्य व १२ कुलपती विशेष पुरस्कार प्रदान केल्या जाणार.